मुंबई ः वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीतील 1 हजार 764 रिक्त जागांसाठी यादी जाहीर झाली असून तिसऱ्या यादीतही एमबीबीएसच्या शासकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठीचा कटऑफ 600 गुणावर पोहचला. खुल्या प्रवर्गात एमबीबीएसला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 615 गुणांचा कटऑफ राहिला. तर दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातून शासकीय महाविद्यालयात 502 एवढा कटऑफ राहिला. यामुळे तिसऱ्या फेरीतही वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी कटऑफ चढाच राहिल्याने प्रवेशासाठी चुरस कायम होती.
एमबीबीएसच्या शासकीय महाविद्यालयांतील जागांसाठी खुल्या प्रवर्गात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्याने नीट परीक्षेत किमान 615 गुण मिळवले असणे अपेक्षित आहे. खासगी महाविद्यालयांसाठी ही पात्रता 545 गुणांची आहे. अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय महाविद्यालयांत हा कटऑफ 600 एवढा असून खासगी महाविद्यालयांसाठी 460 एवढा खाली आहे.
इतर मागासवर्गीयांसाठी सरकारी महाविद्यालयांत 596 आणि खासगी महाविद्यालयांत 528 एवढा आहे. ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी प्रवर्गांसाठी अनुक्रमे 593 आणि 586 एवढा हा कटऑफ आहे. ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी प्रवर्गांतून खासगी महाविद्यालयांत अनुक्रमे 525 आणि 522 गुणांवर प्रवेश मिळणार आहेत.
दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गातून सरकारी महाविद्यालयांत 502 गुण आणि खासगी महाविद्यालयांत 476 गुण असा कटऑफ आहे. हेच अनुसूचित जातींसाठी 423 आणि 399 असे पात्रता गुण आहेत. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारी दंतवैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी किमान 496 गुण मिळवणे अपेक्षित आहे. तर खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठीची पात्रता 457 एवढी आहे. ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सरकारी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर 475 गुण मिळवणे आवश्यक आहे.
खासगी महाविद्यालयांसाठी हा निकष अनुक्रमे 472 आणि 437 एवढा आहे.या निकषांमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे तिसऱ्या यादीत समाविष्ट झाली असून आता एमबीबीएसच्या 789 आणि बीडीएसच्या 975 जागांवर प्रवेशासाठी 4 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या फेरीनंतर राज्यात एमबीबीएसच्या 789 व बीडीएसच्या 975 मिळून 1764 रिक्त जागा आहेत.यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएससाठी 168 तर बीडीएससाठी 60 जागा रिक्त आहेत. तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएससाठी 621 तर बीडीएससाठी 915 जागा रिक्त आहेत. या जागांसाठीची तिसरी निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.