मुंबई: वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) एमबीबीएस, बीडीएससह पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार अखिल भारतीय कोट्याची पहिली समुपदेशन फेरी ४ ते १७ ऑगस्ट, तर राज्य कोट्याची पहिली फेरी १३ ते २२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. यंदाचे शैक्षणिक सत्र ८ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, पुनर्परीक्षेमुळे प्रवेश प्रक्रिया गतवर्षीच्या तुलनेत सुमारे दोन आठवडे उशिराने सुरू होत आहे.
वेळापत्रकानुसार अखिल भारतीय कोटा, डीम्ड विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी पहिली समुपदेशन फेरी ४ ते १७ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार असून, या फेरीतील विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
त्यानंतर दुसरी फेरी २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, तर तिसरी फेरी १० ते १८ सप्टेंबरदरम्यान होईल. दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना ८ सप्टेंबर, तर तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना २६ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
राज्य कोट्याची पहिली समुपदेशन फेरी १३ ते २२ ऑगस्टदरम्यान होणार असून, २८ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. दुसरी फेरी ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर, तर तिसरी फेरी १६ ते २६ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे.
दुसऱ्या फेरीतील प्रवेशाची अंतिम मुदत १४ सप्टेंबर, तर तिसऱ्या फेरीसाठी १ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही कोट्यांतील रिक्त जागांसाठी अखिल भारतीय कोट्याची स्ट्रे व्हॅकन्सी फेरी २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर, तर राज्य कोट्याची ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. यानंतर दोन्ही कोट्यांतील विद्यार्थ्यांना १० ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.