मुंबई : वांद्रे येथील मातोश्रीच्या परिसरातील ठाकरेंचे निष्ठावंत माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांना डावलून हरी शास्त्री यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळली आहे.
उमेदवारी डावलल्याने नाराज झालेले वायंगणकर यांनी आक्रमक पवित्रा घेत बंडाची मशाल पेटवून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. आपण कुठल्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नसून, उलट ही जागा आपण निवडून आणून पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार, असा निर्धारही वायंगणकर यांनी बोलून दाखवला आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे जागवाटपात झालेल्या रस्सीखेचात उद्धवसेनेला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी निष्ठावंत व इच्छुकांना उमेदवारी डावलल्याने बंडखोरी झाली आहे. वांद्रे येथील प्रभाग क्रमांक 95 मध्ये माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षाचे नेते, आमदार डॉ. अनिल परब यांनी आग्रही भूमिका घेतली होती.
तर आमदार वरुण सरदेसाई यांनी हरी शास्त्रीसाठी ताकद लावली. येथील उमेदवारीवरून दोघांमध्ये वादही झाला होता. या भांडणात हरी शास्त्री यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे माजी नगरसेवक वायंगणकर यांनी टोकाचे पाऊल उचलून थेट अपक्ष उमेदवारी अर्ज भरून ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मोठे आव्हान उभे केले आहे.