मुंबई: इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मस्जिद बंदर येथील एका उपकरप्राप्त इमारतीचा एक मजला शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास कोसळला. यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. कोसळलेला मजला अनधिकृत असल्याचे सांगण्यात आले आहे.
१३ हजार उपकरप्राप्त इमारती दक्षिण मुंबईत आहेत. या सर्व इमारती जवळपास १०० वर्षांच्या किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर झाला. मात्र या यादीत नसलेल्या काही इमारतींची पावसाळा सुरू झाल्यानंतर पडझड सुरू झाली आहे.
त्यात शनिवारी आणखी एका इमारतीची भर पडली. सहावा मजला पाचव्या मजल्यावर कोसळल्यानंतर ६ जणांची सुटका करण्यात आली. त्यातील एक व्यक्ती जखमी झाली आहे.
मस्जिद बंदर येथील विठ्ठलदास चंदन मार्गावरील लोखंडवाला इमारत ८० वर्षे जुनी आहे. अतिधोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश नव्हता. ही इमारत ६ मजल्यांची होती.
मात्र त्यातील सहावा मजला अनधिकृत होता. त्यामुळे २०२३-२४ साली इमारतीची दुरुस्ती करताना म्हाडाने सहावा मजला वगळला होता.
मूळ आराखड्यात असणाऱ्या पाच मजल्यांचीच दुरुस्ती करण्यात आली होती. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेला असल्याचे सांगितले जाते.
अतिधोकादायक यादीत इमारत
काही दिवसांपूर्वी वाळकेश्वर येथील सूर्यप्रकाश या उपकरप्राप्त इमारतीचाही सज्जा कोसळला आणि पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. अशाचप्रकारे वरळी येथील इमारतीचाही जिना कोसळला होता.
बदामवाडी येथील द्रौपदी ही उपकरप्राप्त इमारत एलआयसीच्या ६८ इमारतींपैकी एक आहे. एलआयसीच्या अतिधोकादायक १९ इमारतींच्या यादीत ती आहे.