Bombay High Court On Married Women Right On Father Property
मुंबई : हिंदू कायद्यानुसार विवाहित मुलींनाही वडिलांच्या घरी राहण्याचा हक्क आहे, असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी हा निर्वाळा देत सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालय आणि जिल्हा अपीलीय न्यायालयाचे तीन बहिणींना दिवंगत वडिलांची मालमत्ता सोडण्यास सांगणारे आदेश रद्द केले. वडील 1956 पूर्वी किंवा नंतर मरण पावले असले तरी मुलींना वडिलांच्या मालमत्तेवर हक्क आहे, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालयाने वडिलांच्या मालमत्तेवरील हक्क धुडकावल्यानंतर तीन बहिणींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या आपिलावर न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली आणि अपिलकर्त्या बहिणींच्या बाजूने निर्णय दिला. अपिलकर्त्या बहिणींचे वडिल राम हे 1956 पूर्वी किंवा नंतर मरण पावले असले तरी अपीलकर्त्या महिला मुली असल्याने त्यांचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क संरक्षित आहे. हिंदू कायद्याने त्यांना हा हक्क आहे. 1956 पूर्वी राम किंवा त्याच्या मालमत्तेचा वारसा मिळालेल्या वारसांना संबंधित मालमत्तेतून देखभाल करण्याचा अधिकार आहे.
बहिणींच्या म्हणण्यानुसार त्यांना वडिलांनी देखभालीसाठी तिथे राहण्याची परवानगी दिली होती. वडिलांनी स्वतःच्या पैशाने घर बांधले होते. 1949 मध्ये विधवा झालेली एक बहीण तिचे वडील जिवंत असताना राहायला आली होती. नंतर इतर दोघी बहिणी आल्या होत्या. त्यापैकी एक 1956 मध्ये तान्ह्या मुलासह आली होती. 1956 नंतर दोघी बहिणी वडिलांच्या घरी आल्यामुळे त्यांच्या हक्काचा प्रश्न उभा राहिला होता. अखेर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी मुलींच्या वडिलांचा मृत्यू 1956 चा हिंदू कायदा लागू होण्याआधी आणि लागू झाल्यानंतरही झाला असला तरी मुलींचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क अबाधित राहत असल्याचा निकाल दिला होता.
राम यांच्या मुलींची कोर्टात धाव
या प्रकरणातील संबंधित जमीन मूळची नाथा नावाच्या व्यक्तीची होती. त्याला राम आणि चंदर ही दोन मुले होती. कौटुंबिक विभाजनात ती जमीन रामाला मिळाली होती. रामाला तीन मुले आणि तीन मुली होत्या. त्यांच्यात मालमत्तेवरुन वाद झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.