Marathwada Rains
मुंबई : परतीच्या पावसाने धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील इतरही जिल्हांना अक्षरशः झोडपून काढले आहे. अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान आणि घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे तीन दिवसांत ८ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २३) माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. धाराशीवमध्ये बचावकार्य सुरु आहे. अतिरिक्त हेलिकॉप्टर आणता येतील का? यासाठी चर्चा सुरु आहे. काम थांबलेले नसून जसे अहवाल येतील तशी मदत करण्याचे काम सुरु आहे. दुर्दैवी घटना घडली असेल तर तत्काळ मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. उद्या पालकमंत्री आणि मंत्र्यांना जायला सांगितले आहे, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्यांची मदत करत आहोत. केंद्र सरकारने आपल्याला आधीच मदत केलेली असते. आताही केंद्राची मदत आपल्याला मिळणार आहे. आपण वेगवेगळी नुकसान भरपाई देत आहे. काही ठिकाणी ग्रामसेवक आणि सरपंचांनी माहिती दिली तर आपण ती मान्य करतोय. सर्व पालकमंत्री आपआपल्या क्षेत्रात जाऊन आलेत. मी स्वतः देखील जाणार आहे. कुणीही राजकारण करू नये. काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायच असतं, अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांनाही सुनावलं.