मुंबई : मराठी शाळा तसेच मराठी भाषेच्या शिक्षणावर पुन्हा एकदा बुलडोझर चालवण्याचे कारस्थान पालिकेकडून सुरू झाले आहे. गिरण्या जशा नोकरशहा, लोकप्रतिनिधी आणि भांडवलदार यांच्या संगनमताने गिळंकृत झाल्या, तशीच शोकांतिका आता मराठी शाळांवर ओढवते आहे. माहीममधील न्यू माहीम स्कूल हे त्याचे ताजे आणि धक्कादायक उदाहरण आहे. याला विरोध करण्यासाठी आता मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने उद्या (रविवार 9 नोव्हेंबर) रोजी सकाळी 11 वाजता न्यू माहीम स्कूलच्या परिसरात आंदोलन व सभा आयोजित केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा प्रवास मराठी माध्यमातून आंतरराष्ट्रीय मंडळांकडे वळत असताना, ज्या काही मराठी शाळा तग धरून आहेत, त्या पाडून टाकण्याची मोहीमच सुरू झाली आहे. माहीमच्या मोरी रोडवरील जुन्या शाळेचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही; तरीसुद्धा जवळच्याच परिसरातील न्यू माहीम स्कूल ‘मोडकळीस आलेली’ म्हणून धोकादायक घोषित करण्यात आली आहे.
अभिनेत्री चिन्मयी सुमीत, डॉ. दीपक पवार आणि म्हाडाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर प्रभू यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. प्रभू यांनी स्पष्टपणे सांगितले की, थोडी डागडुजी केली तर शाळा उत्तमप्रकारे सुरू राहू शकते. त्यानंतर मराठी अभ्यास केंद्र यांच्या पुढाकाराने नवा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल घेण्यात आला, त्यातही शाळा दुरुस्ती करून वापरता येईल असे निष्कर्ष आले. मात्र, शाळा पाडून साठ मजली टॉवर उभारण्याचा लोभ काही जणांना सुटलेला नाही. ही बाब केवळ न्यू माहीम स्कूलपुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण मुंबईतील मराठी शिक्षणाच्या अस्तित्वावर गदा आणणारी आहे, असा आरोपही मराठी अभ्यास केंद्राने केला आहे.
मराठीबहुल वस्तीतील माहीममधील न्यू माहीम स्कूल या शाळेची इमारत धोकादायक असल्याच्या पूर्वनिर्णयानंतर विद्यार्थ्यांना इतरत्र हलवण्यात आले होते. स्थापत्यविशारदांनी केलेल्या संरचनात्मक मूल्यांकनानुसार ही इमारत धोकादायक नाही. त्यांच्या अहवालानुसार, तिसऱ्या मजल्यावर डागडुजी व दुरुस्ती करून चार ते सहा महिन्यांत शाळा पुन्हा सुरू करता येईल, असे शाळेसाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले असतानाही शाळा पाडण्याचे कारस्थान केले जात आहे.
मुंबईतील मराठी शाळा ‘रिअल इस्टेट’च्या नफेखोर डोळ्यांचा शिकार बनत आहेत. ही स्थिती थांबवायची असेल, तर प्रत्येक मराठी माणसाने आता उठून उभे राहिले पाहिजे यासाठीच रविवारी लढा उभारला जाणार आहे. शाळा टिकल्या तरच मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस टिकेल. यासाठीच सर्वांनी एकत्र येऊन या लढ्याचा आवाज बुलंद करूया, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राने केले आहे.
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
‘हीच वेळ आहे.. एकजुटीने उभे राहण्याची, मराठी शाळा म्हणजे आपल्या अस्तित्वाचा पाया, आणि तो हलू देणार नाही. मराठीचा झेंडा उंच ठेवण्यासाठी, आपल्या शाळांसाठी, आपल्या भावी पिढ्यांसाठी चला या रविवारी माहीमला भेटू या!’ असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राने केले आहे. मुंबई पब्लिक स्कूल, न्यू माहीम स्कूल कॉम्प्लेक्स, मोरी रोड, माहीम (प.) येथे सकाळी 11.00 वाजता सर्वांनी जमावे असे म्हटले आहे.