मराठी व्यावसायिकाने सार्वजनिक शौचालय वापरल्याने मारहाण  pudhari photo
मुंबई

Mumbai Crime : मराठी व्यावसायिकाने सार्वजनिक शौचालय वापरल्याने मारहाण

घाटकोपरमध्ये पुन्हा गुजराती-मराठी वाद; मनसेेकडून आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

घाटकोपर : घाटकोपर पूर्वमध्ये पुन्हा एकदा मराठी-गुजराती वाद समोर आला आहे. पालिकेच्या बिझनेस पार्कमधील सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्याने गुजराती व्यावसायिकांनी मराठी व्यवसायिकाला आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

घाटकोपर पूर्व येथे रेल्वे स्थानकाच्या लगत नालंदा सोसायटी आहे. यात महापालिकेच्या बाजार विभागाचे प्रकल्प धारकांचे कार्यालय आहे. यात दुसऱ्या मजल्यावर अक्षय भांगरे यांचे प्रतीक्षा एजन्सीचे कार्यालय आहे. गेले दीड वर्षे ते या भाड्याच्या कार्यालयात व्यवसाय करीत आहेत. मात्र येथील गुजराती व्यावसायिक झिन गडा आणि निखिल डोमाडीया त्यांना वारंवार त्रास देत आहेत.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी सार्वजनिक शौचालय वापरले म्हणून त्यांना मारहाण केली. याबाबत त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. मात्र आता मुंबई मनपाच्या बाजार विभागाने विविध कारणे देत जागेचे मूळ मालक यांना नोटीस बजावली असून अक्षय हे अनधिकृत भाडोत्री असल्याने त्यांना तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे येथील मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी गडा यांच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र त्यांचे कार्यालय बंद होते. कार्यालयाबाहेर त्यांनी ‌‘मुंबईत फक्त मराठी‌’ असे लिहीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सुधारले नाहीत तर तीव्र आंदोलन

मनसेच्या वतीने त्या मुजोर गुजराती व्यापाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आलो होतो, पण त्यांनी पळ काढला. त्यांच्या दुकानावर संदेश लिहून आलो आहोत. सुधारले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी कार्यालय रिकामे करण्याच्या नोटीस दिल्या आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे मनसेचे अभिषेक सावंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT