Manoj Jarange Maratha Protest Latest Updates
मुंबई : राज्य सरकारकडून मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास आपण मागे हटणार नाही. मला जेलात टाका, गोळ्या घाला, पण मी आता मागे हटणार नाही. मराठा समाजासाठी बलिदान द्यायलाही मी तयार आहे, असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.२९) आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, येत्या मंगळवार आणि बुधवारपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. त्यावेळी आणखी मोठ्या संख्येने लोक आंदोलनात सामील होतील. या आंदोलनाचे सात-आठ टप्पे ठरवले आहेत. आत्ताचा टप्पा पहिला आहे. आम्ही लोकशाहीचा मार्ग सोडणार नाही, मात्र आरक्षण मिळवणारच, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायचं हे सरकारच्या हातात आहे. आम्हाला थांबवायचं, रस्त्यावर आडवायचं, गोळ्या मारायच्या की परवानगी द्यायची, हे पूर्णपणे सरकारच्या हातात आहे, असेही ते म्हणाले.
आंदोलनस्थळी पाणी नाही, संडास-बाथरूमही बंद ठेवले आहे. सरकारचे हे वागणं इंग्रजांपेक्षा धोकादायक आहे. सरकार आडमुठेपणाने वागत असेल, तर मराठेही आडमुठेपणानेच उभे राहतील. परिस्थिती सरकारने समजून घेणं गरजेचं आहे. एक दिवस-दोन दिवस अशा रडक्या सारख्या परवानग्या देऊन सरकार आम्हाला थकवायचा प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला ही वागणूक देणं योग्य नाही. कार्यकर्ता तुमचा असला तरी तो मराठा समाजाचाच आहे. सरकारने हे लक्षात ठेवावं, असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला.