मुंबई

Maratha Andolan : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात

मुंबई शहर हाय अलर्टवर; आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरुप

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • मराठा आरक्षण आंदोलन : मुंबई पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

  • आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त

  • केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी सकाळीच आझाद मैदानात दाखल

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

आंदोलनादरम्यान लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकत्र जमणार असल्याने आझाद मैदानात कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसंकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान सीसी कॅमेराद्वारे पाहणी करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या कालावधीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेताना कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.22) मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाची हाक दिली होती. या उपोषणाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली होती. त्यामुळे त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी सुरु केली होती. यावेळेस जरांगे-पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन माघार घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने या आंदोलनाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी सकाळीच आझाद मैदानात दाखल झाली होती. या पथकाने संपूर्ण आझाद मैदानाची पाहणी करुन बंदोबस्ताची आखणी केली होती. या पथकासह मुंबई पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असे सुमारे दोन ते अडीच हजार पोलीस तिथे बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहे.

त्यांच्यासोबत राज्य राखीव दलाची तुकडी, दंगल नियंत्रण पथक, क्यूआरटी, बॉम्बशोधक व नाथक पथक, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच वाहतूक पोलिसांची मदत घेतली जात आहे. आंदोलनामुळे काही मार्गात बदल करण्यात आले आहे. जागोजागी वाहतूक पोलिसांना बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे. जेणेकरुन वाहतूकीची समस्या निर्माण होऊ नये. जरांगे-पाटील हे नवी मुंबईमार्गे मुंबईत येत असल्याने जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अमित शहा यांचा मुंबई दौरा

गणेशोत्सव, मराठा समाजाचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी अमीत शहा मुंबईत आल्यानंतर लालबागचा राजासह इतर प्रमुख गणेशोत्सव मंडळ, काही भाजप नेत्यांच्या घरी जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षेसह मुंबई पोलिसांनी अतिरिक्त तुकडी त्यांच्यासोबत ते जिथे जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत असणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची शुक्रवारी खरी परिक्षा असणार आहे. या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच बंदोबस्तात कुठेही हलगर्जीपणा होणार नाही यासाठी पोलिसांना विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT