मुंबई : नमिता धुरी
शेतीवाडीची कामे कुटुंबावर सोपवून प्रत्येक घरातला एक तरी मराठा मुंबईत आंदोलनासाठी आला आहे. या आंदोलकांमध्ये बहुतांशी सहभाग मराठवाड्यातील मराठ्यांचा आहे. जोडधंदा करण्यासाठी योग्य वातावरण नाही आणि नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत अशा कात्रीत सापडलेली ही कुटुंबे पूर्णतः शेतीवर आधारित आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर गावच्या आंदोलकांनी कापूस आणि सोयाबीनची पेरणी जून-जुलैमध्येच केली आहे. मधल्या काळात कापसाच्या रोपांना फुले येतात. त्यांचे रुपांतर फळांमध्ये होते. साधारण नवरात्रोत्सवानंतर फळे फुटून कापूस बाहेर येतो. तुळजापूरचे पांडुरंग चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक एकरात ३० किलो सोयाबीनचे पीक घेण्यासाठी ३० हजार रुपये खर्च येतो. त्याची विक्री करून ४० हजार रुपये मिळतात. सोयाबीन बाजारपेठेत पोहोचवण्यासाठीही काही खर्च येतो. सर्व काही वजा करून ५ ते १० हजार हातात राहतात.
फलटणचे दीपक यादव सांगतात, १ एकरवर ऊस लावण्यासाठी ५० हजार ते १ लाख रुपये खर्च येतो. ऊस कारखान्याला दिल्यावर दीड लाख जमा होतात. लागवडीचा खर्च वजा केल्यास १८ महिन्यांतून एकदा ५० हजार रुपये मिळतात. निंबळक गावात फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण ५० ते ६० टक्के आहे. ३० हजार रुपये खर्च करून मका लावल्यास ४ महिन्यांतून एकदा १५ हजार रुपये मिळतात.
संगमनेरचे किरण भुसाळ यांनी फेब्रुवारी २०२४मध्ये डाळिंबाची लागवड केली आहे. त्याला दोन वर्षांनी फळे लागतील. मधल्या काळात पाणी देणे, फवारणी करणे ही कामे केली जातात. डाळिंबाची विक्री करून साधारण साडे तीन लाख रुपये मिळतील. त्यातून लागवडीचा दीड-दोन लाख रुपये खर्च, ३०-४० हजार वाहतूक खर्च वजा केल्यास हाताशी साधारण १ लाख रुपये उरतील. वर्षातून एकदा फळ लागत असल्याने वार्षिक लाखभराचे उत्पन्न मिळत राहील.
शेतीचा व्यवसाय पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न अनिश्चित असते. जोडधंद्यांमध्ये यश येत नाही आणि मुंबई, पुण्यासारख्या खासगी नोकरीच्या संधी ग्रामीण भागांत नाहीत. त्यामुळे अल्प उत्पन्नात खासगी महाविद्यालयांचे महागडे शिक्षण कसे घ्यायचे, त्यासाठी आरक्षण द्या, अशी मागणी आंदोलक करत आहेत.
शेतीच्या उत्पन्नावर भागत नाही म्हणून बीडचे संजय चेन्ने यांनी ६०० कोंबड्या पाळून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी ७० ते ८० हजार रुपये गुंतवणूक केली. अति तापमानामुळे ७० टक्के कोंबड्या मेल्या. परिणामी, चेन्ने यांचा धंदा बुडाला. गायी, म्हैशी पाळून दुधाचा धंदा करण्याचा पर्यायही शेतकरी चोखाळून पाहतात. पण जास्त तापमान आणि अपुरा पाणी पुरवठा तसेच दूरच्या गावी असलेली बाजारपेठ यांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुधाचा धंदाही करता येत नाही. तुळजापूरच्या चव्हाणवाडीतले काही जण तेलाच्या कंपनीत नोकरीला जातात. पण तिथे येण्या-जाण्याचा खर्च १०० रुपये आहे. प्रतिदिन १२ तास काम केल्यानंतर फक्त ५०० रुपये पगार मिळतो. त्यामुळे शेतीशिवाय दुसरा पर्यायच नाही.'