कर्जत (रायगड) : कर्जत सकल मराठा समाज यांच्या वतीने रविवारी (दि. 24 ऑगस्ट) सकाळी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कर्जत तालुक्यातील समन्वयक तसेच ज्येष्ठ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचा उद्देश होता - आगामी मुंबई आंदोलनाला कर्जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा कसा द्यायचा याचे नियोजन करणे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत बेमुदत उपोषणास सुरुवात करणार आहेत. या आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून मराठवाडा, विदर्भ आणि इतर भागांतून हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार आहे. मुंबईजवळ असल्याने कर्जत तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी ही बैठक घेण्यात आली.
बैठकीत एकमताने ठरले की, 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8:27 वाजता कर्जत स्टेशनवरून सुटणार्या लोकलने सर्व बांधवांनी एकत्र मुंबईकडे प्रयाण करावे. तसेच भिवपुरी, नेरळ आणि शेलू येथील बांधवांनीही याच लोकलला सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षणाचा ठोस निर्णय द्यावा, हीच सर्वसामान्यांची भावना व्यक्त करण्यात आली. अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आता तरी सोडवून समाजाला न्याय मिळावा, अशी मागणी या बैठकीतून एकमुखाने करण्यात आली.
यापूर्वीही कर्जत तालुक्याचा मराठा आंदोलनात मोठा सहभाग राहिला आहे. मागील वर्षी जरांगे पाटील हे वाशी येथे आंदोलनासाठी दाखल झाले असताना, चौक येथे कर्जत तालुक्यातील मराठ्यांनी भाकरी वाटप करून त्यांना मोठा पाठिंबा दिला होता. हजारो लोकांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उपस्थित राहून समाजाची ताकद दाखवून दिली होती. हीच ताकद यावेळीही दिसून येईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाचा उत्साह घराघरात असतानाही मराठा बांधवांनी विधिवत पूजा करून आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होण्याचा निर्धार केला आहे.