

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत (Indrajeet Sawant) यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास राज्यभरात पडसाद उमटतील, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानजनक बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात वातावरण तापले आहे. दुसरीकडे आपण सावंत यांना फोनवर धमकी दिली नाही. माझा आवाज वापरला गेला, मी स्वतः पोलिसात तक्रार दिली आहे, असे सांगणारे पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या नागपुरातील घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
डॉ. प्रशांत कोरटकर आणि पल्लवी कोरटकर अशी नावाची पाटी असलेल्या साई पालवी या त्यांच्या घराभोवती दोन पोलिस दोन होमगार्ड अशी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ते घरी नसल्याचे सांगण्यात आले. आपल्याला उगाच गोवले जात असून माझ्या कुटुंबाला मनस्ताप होत आहे. आपल्याला धमकी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी नागपुरात आंदोलन सुरु झाले आहे. प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर सकल मराठा समाजातर्फे घोषणा देत हे आंदोलन केले जात आहे. कोरटकर यांच्या अटकेची मागणी आंदोलकांनी केली आहे.
इंद्रजित सावंत (रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) यांना मोबाईलवरून प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकीसह शिवीगाळीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधला. या घटनेची गंभीर दखल घेत सखोल चौकशीसह कारवाईचे त्यांनी आदेश दिले आहेत. आवश्यकता भासल्यास सावंत यांना सुरक्षा यंत्रणा पुरविण्याचे आदेशही दिले आहेत.