Manoj Jarange Patil File Photo
मुंबई

Manoj Jarange Patil: पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंकडून पाणी आणि सलाईनही बंद

मनोज जारंगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनने परवानगी दिलेली नाही.

मोहन कारंडे

Manoj Jarange Patil

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनने परवानगी दिलेली नाही. परवानगी अर्ज काल दुपारी पोलिसांकडे देण्यात आला होता. दरम्यान, सरकारला पुनर्विचार करून परवानगी द्यावीच लागेल. आतापासून सलाईन आणि पाणी देखील बंद करत आहे. १९ तारखेला आंदोलन होणारच, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

वीरेंद्र पवार हे आझाद मैदान पोलीस ठाण्यात गेले होते. येथे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलनास परवानगी नाकारण्या मागील कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही परवानगीचा अर्ज शनिवारी सादर करण्यात आला होता. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याचेही या अर्जात नमूद करण्यात आले होते.

परवानगी नाकारण्याची मुख्य कारणे

गणेशोत्सवामुळे सुरक्षेचा प्रश्न: 14 सप्टेंबरपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तिथे लागणार आहे. या गर्दीत आंदोलन झालं तर सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल.

कोर्टाचे आदेश आणि नवीन कायदा: सुप्रीम कोर्टाच्या अमित सहानी केस मधील आदेश आणि मुंबई हायकोर्टाचे आदेश, तसेच 'जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम 2025' मधील कलम 46(5)(6) नुसार परवानगी देता येणार नाही.

जागा अपुरी आणि मुंबई ठप्प होण्याची भीती: जरांगे यांनी 4,000 ते 4,500 आंदोलक येतील असं सांगितलं आहे. पण आझाद मैदानात इतकी क्षमता नाही. यापूर्वी 2024 मधील आंदोलनात वाहतूक, शाळा, व्यवसाय, रुग्णालयावर परिणाम झाला होता. यावेळीही मुंबईच्या जनजीवनावर परिणाम होईल.

कायदा सुव्यवस्थेचा अनुभव: 2024 च्या आंदोलनात 5 हजार आंदोलक आले होते, काहींवर गुन्हे दाखल झाले होते. तसेच अर्जदाराने यापूर्वीच "मुंबई बंद" करण्याचे आवाहन केल्याने कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

या कारणांमुळे आझाद मैदानात 19 सप्टेंबरपासूनच्या आंदोलनाला परवानगी नाकारत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही शेवटची आणि आरपारची लढाई असून, १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून मराठ्यांचे वादळ मुंबईकडे झेपावणार आहे. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. सकल मराठा बांधवांशी संवाद साधताना त्यांनी संपूर्ण मराठा समाजाने या लढाईचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईत मोठ्या संख्येने दाखल होण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईतील हे आंदोलन शांततेत होईल, असा शब्द जरांगे यांनी दिला आहे. मात्र आंदोलनात आमच्या एखाद्या तरुणाचे रक्त सांडल्यास अवघ्या दहा मिनिटांत संपूर्ण महाराष्ट्र बंद करू, असा थेट इशाराही त्यांनी दिला. ज्यांना मुंबईत येणे शक्य नाही, त्यांनी आम्ही जाणाऱ्या मार्गावर दीडशे कि. मी. पर्यंत आमच्यासोबत चालावे, असे आवाहन त्यांनी केले.

आरक्षणाच्या या लढ्यासाठी मराठा भगिनींनी घरात न थांबता मोठ्या संख्येने मुंबईला यावे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांना मराठा भगिनींनी आरक्षणाचे हळदी-कुंकू लावून आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशी साद जरांगे यांनी घातली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT