Dada Garud Video : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी दादा गरुडचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. नव्या व्हिडीओत बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक नवा दावा करण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यापूर्वी दादा गरुड याचे दोन व्हिडिओ समोर आले होते. यामध्ये जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी घेतलाचा दावा करण्यात आला होता. आता नवीन व्हिडिओमध्ये गरूडने असा दावा केला आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. हा दावा करताना त्याने धनंजय मुंडे आणि सुशील कराड यांचाही उल्लेख केला आहे. मात्र दादा गरुड हा नेमकं कोणाला सांगतोय, या व्हिडिओ मधून स्पष्ट होत नाहीय. शिवाय २० कोटी रुपयांची ऑफर कोणी दिली या संदर्भातही संभाषणामध्ये उल्लेख आढळत नाही मात्र ही क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.
बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या झाली. या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. देशमुखयांचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या झाल्याचा व्हिडिओही व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप झाले. अखेर मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.