Uday Samant Pudhari
मुंबई

Maratha reservation protest : जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाची तारीख अजून अनिश्चित; उद्या निर्णय घेणार

आंदोलनाची गरज पडणार नाही : मंत्री उदय सामंत यांचा विश्‍वास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे अंतरवालीत उपोषण सुरू असून सरकारने अद्याप मागण्या मान्य न केल्याने त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, जरांगेंनी त्यासाठी अजून तारीख जाहीर केली नसल्याने संभ्रम कायम आहे.

शनिवारी (दि. १२) दुपारी याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचे जरांगे यांनी मुंबईत याबाबत तयारीच्‍या नियोजनात असलेल्‍या समन्वयकांना कळविले आहे; तर दुसरीकडे जरांगे यांच्या उपोषणावर १२ तारखेपूर्वी मार्ग निघेल. त्यामुळे त्यांना मुंबईत आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असा विश्‍वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्‍यक्‍त केला आहे.

जरांगे यांच्या उपोषणाला १३ दिवस झाले तरी या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. ५८ लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना कुणबी दाखले देणे यासह सातारा व कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटिअरमधील नोंदीच्या आधारे कुणबी दाखले देण्याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

सरकार चर्चा करत असले तरी निर्णय घेत नसल्याने जरांगेंनी अंतरवालीतील आंदोलनातून मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, नेमके कधी आंदोलन होणार ही तारीख जाहीर केली नाही. मुंबईत आंदोलन होणार असल्याचे पोलीस व संबंधित यंत्रणांना कळविण्यात आले असले तरी त्यांनाही तारीख कळवण्यात आलेली नाही.

गणेशोत्‍सवापूर्वी उपोषण थांबवणार

ऐन गणेशोत्‍सवाच्‍या काळात लाखोंच्या संख्येने मराठे मुंबईत दाखल झाले तर पोलिसांवरील ताण वाढणार आहे. मनोज जरांगे यांनी १२ सप्टेंबरनंतर मुंबईत येण्याचा इशारा दिला असला तरी त्याच्या अगोदरच आम्ही जरांगे यांचे उपोषण थाबंवण्याचा प्रयत्न करू, असे सांगून राज्यात गणेशोत्सव आणि इतर सण उत्सवांत नागरिकांना त्रास होऊ नये याची आंदोलनकर्त्यांनी आणि जरांगे यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जरांगे यांच्याशी सरकारच्या वतीने चर्चा करणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

ते म्हणाले, आम्ही मराठा समाजाच्या न्याय्य हक्काच्या मागण्या पूर्ण करत आहोत. मात्र कोणाच्याही ताटातील कोणालाही देणार नाही. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, याची दक्षता सरकार घेत आहे. सध्या दिले जाणारे प्रमाणपत्र कुठेही ओबीसीच्या वाट्याचे दिले जात नाही. निजामाच्या सत्ताकाळातील मराठा कुणबी नोंदी मिळाल्या नव्हत्या, त्या शिंदे समितीने शोधून काढल्या आहेत. त्यांना आपण प्रमाणपत्र देत आहोत, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT