मुंबई : गेल्या दोन वर्षांच्या आंदोलनानतर मराठा समाजाच्या लढाईला यश आले आहे. आम्ही काही तातडीच्या मागण्या सरकारकडून मान्य करुन घेतल्या आहेत. हैदराबाद गॅझेटीअरची तत्काळ अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील अशा प्रमुख सहा मागण्या आमच्या पूर्ण झाल्या आहेत. आणि आम्ही सरकारच्या उपसमितीकडून हे जिआर च्या माध्यमातून खात्री करुन घेतले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फसवणूक करणार नाहीत असा विश्वास मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ‘पुढारी न्युज’ला मनोज जरांगे यांनी विशेष मुलाखत दिली यावेळी त्यांनी सरकारच्या जि.आर. बाबत विश्लेषण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
मनाेज जरांगे यांनी आतापर्यंत नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे पण आज त्यांनी फडणवीस यांचे कौतूक केले. याबाबत बोलताना ते म्हणाले की राजकारणाचे आम्हाला काही देणे घेणे नाही. फडणवीस यांनी आता जि.आर.काढला याचे आम्हाला कौतूक आहे. राजकारण करणारे करतील मी मात्र समाजासाठीच लढणार आहे. त्यामुळे समाजाच्या कोण आडवे येत असेल तर मात्र त्याला मराठा सोडणार नाही असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. फडणवीस साहेबांशी आमचे शत्रुत्व नाही.त्यांचे आमचे काही वैर नाही, पण सुरवातीला झालेल्या आंदोलनावेळी मराठा आंदोलकांना पोलिसांकडून अतिशय अमानुष मारहाण झाली होती त्यामुळे त्यांच्यावर समाजाचा रोष होता. पण आता आम्हाला काहीच अडचण नाही पण त्यांनी परत समाजाची फसवणूक केली तर मराठे पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागतील. असा इशाराही जरांगे यांनी दिला.
हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीमुळे फायदा
यावेळी त्यांनी हैदराबाद गॅझेटची अमंलबजावणी ही प्रमुख मागणी सरकारने मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. गॅझेटमुळे मराठा हा कुणबीच होता, कायद्याने आणि दस्तऐवजानेही तो कुणबी आहे. सुधारित जि.आर.मध्ये आम्ही तशी मागणी मान्य करुन घेतली आहे. गॅझेटमधील नोंदींमुळे किमान सातबारावर नाव असलेल्या अनेक मराठ्यांना कुणबी दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील लोकांना फायदा होणार आहे. माझ्याविषयी खूप लोक काहीतरी बोलत असतो पण मी लक्ष देत नाही. मी समितीकडून शब्द घेतला होता. कोण काय बोलतो याकडे लक्ष द्यायचं नाही,
‘सरसकट’वरून समजूतदारपणा दाखवला का
सरसकटवरून समजूतदारपणा दाखवला का, याविषयी त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला सांगितले आहे की टप्प्या - टप्प्याने याने पुढे जायचे आहे. महाराजांनी १ - १ गड काबिज करुन स्वराज्य निर्माण केले. काही वेळा दोन पावले मागे घेतली. त्याच पद्धतीने आमची वाटचाल सुरु आहे. हळू हळू सर्व मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार, समाजहीतासाठी काही वेळा माघार घ्यावी लागते. आपल्याला काट्याच्या रस्त्याने जायचं का चांगल्या रस्त्यांनी जायचं ते ठरवायचं, काट्याच्या रस्त्याने गेल्यावर काटे टोचणारच पण चांगला रस्ता जरी लांब असला तरी फायद्याचा आहे अशी भूमिकाही जरांगे यांनी मांडली.