मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले असले तरी त्यांच्याकडील कृषिखाते अखेर काढून घेण्यात आले असून दत्ता भरणे हे नवे कृषी मंत्री असतील असे मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागातून गुरुवारी जाहीर करण्यात आले.
भर विधानसभेत खेळलेला रमीचा खेळ कोकाटे यांच्या अंगलट आला. या खेळात कृषी खाते गमावल्यानंतर कोकाटे यांना आता भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग देण्यात आला आहे. दोन दिवसांत ही खाते बदलाची कारवाई होईल, असे सांगितले जात होते; मात्र गुरुवारी रात्रीच मंत्रालयातून या बदलाची अधिसूचना जारी झाली.
माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली होती. रमी खेळणारे मंत्री नकोत, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
कोकाटे यांचा राजीनामा घेतल्यास अन्य वादग्रस्त मंत्र्यांचीही विकेट जाऊ शकते, लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात झालेल्या चर्चेत कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांचे कृषी खाते अखेर काढण्यात आले व त्यांच्याच राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना ते देण्यात आले. भरणे आणि कोकाटे हे एकाच पक्षाचे असल्यामुळे खाते बदल सुलभ झाल्याचे बोलले जात आहे.