Manikrao Kokate Controversy
सरकार विरोधात वक्तव्य आणि विधीमंडळ सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे वादात सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. दरम्यान, कोकाटे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती राजकीय सुत्रांनी दिली आहे.
सातत्याने कोकाटे यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये, सभागृहातील रमी खेळतानाच्या कृतीचा निषेध आहे. पण त्यांचा राजीनामा तूर्तास घेण्यात येणार नाही. हल्ली प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त असतो म्हणून राजीनामा घेणे कितपत योग्य आहे, असा सूर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
आधी कोकाटे यांचा विधीमंडळ सभागृहातच मोबाईलवर रमी खेळत असल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि.२२ जुलै) 'शेतकरी भिकारी नाही, तर शासन भिकारी आहे', असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकोटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या, अशी मागणी सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पण आता कोकोटे यांचा राजीनामा घेण्याबाबत थोडे थांबावे, असा सूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे कोकोटे यांना तूर्तास तरी अभय मिळाल्याचे दिसते.
कृषिमंत्री कोकाटे यांनी काल शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी पीक विम्याबाबत बोलताना "सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही," असे वादग्रस्त विधान केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांना आमदार निवासाच्या कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. याची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. त्यांनी या प्रकरणी कारवाईचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पैशांनी भरलेल्या बॅग सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली. यामुळे आता राष्ट्रवादीनेही कोकाटे यांच्या बाजूने उभे राहावे, असा सूर पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.