माणगाव : कमलाकर होवाळ
माणगाव शहराच्या दीर्घकालीन पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळ्यानंतर पुन्हा वेगाने सुरू झाले आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि भविष्यातील गरजांचा विचार करून उभारण्यात येणारी ही योजना पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
सुमारे 54 कोटी रुपये खर्चाची ही भव्य पाणीपुरवठा योजना माणगाव शहरासाठी एक मोठे वरदान ठरणार आहे. खांदाड येथे 7 लाख लिटर क्षमतेची मुख्य पाणीपुरवठा टाकी उभारण्यात येणार असून खांदाड, बामणोली रोड, नाणोरे, रेल्वे स्थानक परिसर, गणेशनगर, उतेखोल आणि जुने माणगाव या भागांमध्ये 2 ते 3 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन टाक्यांची कामे सध्या वेगाने सुरू असून ती लवकरच पूर्ण होणार आहेत. याशिवाय गतवर्षी खांदाड, उतेखोल, नाणोरे, भादाव आणि जुने माणगाव या भागांमध्ये पूर्ण क्षमतेच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत माणगाव शहरात उच्च दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा सुरू होईल, असा विश्वास संबंधित यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी मीटर प्रणाली. योजना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक घर, आस्थापना व व्यावसायिक वापरासाठी पाणी मीटर बसवण्यात येणार असून वीज मीटरप्रमाणे दरमहा पाणी वापराचे बिल देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे प्रत्येक थेंबाची मोजणी होऊन त्यानुसारच वसुली केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत एकूण 8 पाण्याच्या टाक्यांपैकी 5 टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित 3 टाक्यांची कामे अंतिम टप्प्यात वेगाने सुरू आहेत. खांदाड येथील जलशुद्धीकरण केंद्र, पाणी उपसा केंद्र ही महत्त्वाची कामे सध्या प्रगतीपथावर असून मुख्य पाणीपुरवठा टाकीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायत कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
पाणी मीटरमुळे अनावश्यक पाण्याचा अपव्यय थांबेल, मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल आणि जाणीवपूर्वक वापराकडे नागरिकांचा कल वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, जादा पाणी वापरणाऱ्या आणि पाणी वाया घालवणाऱ्यांवर आर्थिक पायबंद बसणार असल्याने नागरिकांनी जबाबदारीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे. माणगाव शहराच्या विकासात महत्त्वाची भर घालणारी ही पाणीपुरवठा योजना भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत आणि सुरक्षित पाणीव्यवस्था निर्माण करेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.