Manda Mhatre Ganesh Naik Dispute Pudhari
मुंबई

Manda Mhatre Ganesh Naik Dispute: आ. मंदा म्हात्रेंकडून मंत्री गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

म्हात्रे-नाईक वादात आता मुख्यमंत्री काय तोडगा काढतात, याबाबत उत्सुकता आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्षानंतर आता नाईक विरुद्ध भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील वाद समोर आला आहे. मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत गणेश नाईक यांच्याविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. म्हात्रे-नाईक वादात आता मुख्यमंत्री काय तोडगा काढतात, याबाबत उत्सुकता आहे.

आरोग्यविषयक सुविधांच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला.

त्यावरून शिवसेना शिंदे गट विरुद्ध मंत्री गणेश नाईक यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्यातच स्थानिक आमदार असूनही आपल्याला विश्वासात न घेता आणि राजशिष्टाचाराला हरताळ फासत हा सोहळा उरकला गेल्याचा आरोप करत भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रे यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. या सर्व घटनेनंतर आमदार म्हात्रे यांनी मंगळवारी, मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांकडे नाईक यांच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचला.

दरम्यान, मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधताना म्हात्रे म्हणाल्या, तुमच्या स्वतःच्या ऐरोली मतदारसंघात काय चालले आहे ते आधी बघा, तिथले त्रस्त लोक कामे घेऊन माझ्याकडे येत आहेत. आमच्या प्रत्येक चांगल्या कामात खो घालण्याचे काम सुरू आहे.

निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत, याची जाणीव संबंधितांनी ठेवावी, असा इशारा देत मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. कोकण किनारपट्टीवर आगरी आणि ओबीसी समाजाची आपण एकमेव महिला आमदार असून मुद्दाम दुखावले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT