गोरेगाव : मालाड पश्चिमेतील मालवणी प्रभाग क्रमांक 34, गेट क्रमांक 6 परिसरात गेल्या वर्षभरापासून भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला होता. कुत्र्यांनी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत 2 ऑक्टोबर रोजी ‘दैनिक पुढारी’मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. अखेर पालिकेने तातडीने पथक पाठवून येथील भटक्या कुत्र्यांना जेरबंद केले.
या परिसरात कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते सम्राट बागुल यांनी या समस्येबाबत महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे लेखी तक्रार केली होती. याची दखल घेत मंगळवारी (दि. 7) मनपा पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने कारवाई करत संबंधित भटक्या कुत्र्यांना पकडून जेरबंद केले. या मोहिमेत डॉ. सचिन कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने परिश्रम घेतले. पालिकेच्या या कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.