राजेश सावंत
मुंबई: कोकणातील जत्रेमध्ये आवर्जून मिळणारा मालवणी खाजा आता परप्रांतीय झाला आहे. पूर्वी स्थानिक कुटुंब खाजा बनवताना दिसत होती. आता खाजा बनवण्यारी बुद्धीराम विश्वकर्मा फुड्स एल. एल. पी. कंपनी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कोकणी खाद्यपदार्थांना मुंबईत बाजारपेठ मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मुंबईच्या महापौरांना भेटून साकडे घालत आहेत. पण पारंपारिक कोकणी खाद्यपदार्थावर परप्रांतीय ताबा मिळवत असताना, लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष होत आहे. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी खाजा ही प्रसिद्ध मिठाई आहे.
बेसन व गुळाचा पाक करून तयार केलेल्या या खाज्याला मुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसांची सर्वाधिक पसंती आहे. त्यामुळे कोकणातील प्रत्येक जत्रेमध्ये खाजा मिळणार नाही असे होणारच नाही. एवढेच काय तर आता कोकणातील बाजारपेठेमध्येही खाज्याची मागणी वाढली आहे. पण हा खाजा आता कोकणी माणसाचा राहिलेला नाही. खाजाची वाढती मागणी लक्षात घेऊन, उत्तर प्रदेश बिहारी माणसाने सिंधुदुर्गात घुसखोरी केली आहे.
कोकणी माणसाचा हा पारंपारिक मालवणी खाजा आता बुद्धिराम विश्वकर्मा फूड्स कंपन्यांनी ताब्यात घेतला आहे. खाज्याची निर्मिती करून, तो कोकणातच नाही तर राज्यात विकला जात आहे. खाज्याच्या पिशवीवर गंगू माऊली सुप्रसिद्ध मालवणी खाजा असा उल्लेख असला तरी, पॅकिंग पिशवीच्या खाली बुद्धीराम विश्वकर्मा फुड्स एल. एल. पी. कंपनी असा उल्लेख आहे.
विशेष म्हणजे ही कंपनी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे आहे. परप्रांतीयांची कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत असताना त्यांना परवाना कोणी दिला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कोकणी खाद्यपदार्थांना मुंबईत बाजार उपलब्ध करून देण्यासाठी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी महापौर रितू तावडे यांची भेट घेतली होती.
जर कोकणी खाद्यपदार्थांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असतील तर कोकणात येणाऱ्या परप्रांतीय कंपन्यांना का रोखले जात नाही, असा प्रश्न कोकणी माणसाला पडला आहे.
आमदारांचे मोघम उत्तर
मालवणी खाद्याचा परप्रांतीयांनी ताबा घेतल्याकडे आमदार प्रमोद जठार यांचे मुंबई महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत लक्ष वेधले असता, त्यांनी फारसे गंभीर्याने घेतले नाही. कोकणी माणसाकडे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी मोठ्या कंपन्या उघडणे शक्य नसल्यामुळे पैसेवाले कंपन्या सुरू करून खाद्यपदार्थ बनवतात. असे मोघम उत्तर त्यांनी यावेळी दिले.
हॉटेलमध्येही परप्रांतीय
कोकणामध्ये अनेक बेरोजगार तरुण असताना येथील हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय दिसून येतात. विशेष म्हणजे हे परप्रांतीय वेटर चक्क हिंदीमध्ये संवाद साधतात. मग काय आपला कोकणी माणूसही आपली मालवणी व कोकणी भाषा सोडून, तोडकी मोडकी हिंदी बोलून वेळ मारून घेतात. पण कोणीही या परप्रांतीयांसोबत मराठीत संवाद साधत नाही. त्यामुळे परप्रांतीयांची मुजोरी येणाऱ्या काळात वाढली नाही म्हणजे मिळवले.