Mumbai Malvani house collapse
मालाड : मालाड पश्चिमेतील मालवणी, गेट क्रमांक ७ येथील नवीन कलेक्टर कंपाऊंड परिसरात आज दुपारी दोन मजली घर अचानक कोसळल्याची दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
घर कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस तसेच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याची तपासणी करण्यात आली असून दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
मालवणीत घर कोसळण्याच्या घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. परिसरातील अनधिकृत व धोकादायक बांधकामांवर प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात अशा दुर्घटना पुन्हा पुन्हा घडत असल्याने या कारवाईच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या काही वर्षांत मालवणी परिसरातील विविध दुर्घटनांमध्ये जवळपास १५ ते १६ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक दुर्घटनेनंतर केवळ पंचनामा, कारवाई आणि आश्वासनांपुरते प्रशासन मर्यादित राहणार की अनधिकृत व धोकादायक बांधकामांवर कायमस्वरूपी कठोर कारवाई होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दुर्घटना घडली की प्रशासन जागे होते; काही दिवस कारवाईचा गाजावाजा होतो आणि पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. हीच उदासीनता भविष्यात आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देणार नाही ना, असा सवाल आता मालवणीकर विचारत आहेत.