मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात एका 46 वर्षांच्या महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. राणी जितेंद्र शुक्ला असे या महिलेचे नाव असून तिची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.
याप्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. दरम्यान मारेकर्याची ओळख पटली असून त्याच्या अटकेसाठी एक टिम रवाना झाली आहे. त्याच्या अटकेनंतर हत्येमागील कारणाचा खुलासा होणार आहे.
गुरुवारी सकाळी मालाडच्या मालवणी चर्च परिसरात एका महिलेचा मृतदेह पडला असल्याची माहिती मालवणी पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या महिलेला तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात या महिलेची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासात मृत महिलेची ओळख पटली असून तिचे नाव राणी शुक्ला आहे. ती तिच्या आई, भाऊ आणि तेरा वर्षांच्या मुलीसोबत कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत होती.
बुधवारी ती मालवणी परिसरात आली होती. तिथेच तिच्या परिचित व्यक्तीने त्यांच्यातील झालेल्या भांडणानंतर तिची हत्या केल्याचा संशय आहे. या मारेकर्याची ओळख पटली असून लवकरच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. त्याच्या अटकेनंतर त्याने राणीची कुठल्या कारणासाठी हत्या केली याचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.