मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित व अन्य पाच आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या विशेष सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यातील पीडितांनी दाखल केलेल्या अपिलावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर 15 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
या अपिलात दोषपूर्ण तपास किंवा तपासातील काही त्रुटी आरोपींना निर्दोष सोडण्याचे कारण असू शकत नाही, असा दावा करण्यात आला असून आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेमुळे प्रज्ञासिंगसह अन्य आरोपींच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या घटनेत 6 ठार, तर 100 हून अधिक जण जखमी झाले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्या विरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (युएपीए), आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तर श्याम साहू, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना यात फरार आरोपी दाखवण्यात आले आहे.
अनेक साक्षीदार पुरावे तपासल्यानंतर तसेच सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा 31 जुलै रोजी निकाल जाहीर केला व सातजणांची सुटका केली. मात्र सत्र न्यायालयाच्या या निकालाला बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. निसार अहमद सय्यद बिलाल यांच्यासह अन्य पाच जणांनी अॅड. मतीन शेख यांच्यामार्फत हे अपील दाखल केले असून विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे.