मुंबई : ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि त्यानंतर अधूनमधून होत असलेल्या पाऊस यामुळे मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुण्या, लेप्टो व हेपेटायटीसच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये मलेरियाच्या रुग्णांनी दीड हजारांचा तर डेंग्यूच्या रुग्णांनी एक हजाराचा टप्पा ओलांडला. मागील तीन महिन्यांमध्ये या आजारांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ झाली असली तरी अतिसाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
मुंबईमध्ये पावसाच्या अनिश्चित स्वरुपामुळे मागील तीन महिन्यांमध्ये साथीच्या आजारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. साधारणतः डासाची डंख केलेल्या आजारांचे रुग्ण ऑगस्ट महिन्यात उच्चांकावर पोहोचते. त्यानुसार जून व जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये मलेरिया सर्वाधिक १ हजार ५५५ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल डेंग्यूचे १ हजार १५९, लेप्टोचे २२७, चिकुनगुण्या २२०, हेपेटायटीस १९७ रुग्ण सापडले आहेत. मात्र गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत ऑगस्टमध्ये घट झाली आहे.
ऑगस्टमध्ये गॅस्ट्रोचे ५९२ रुग्ण सापडले आहेत. मलेरिया, डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी घरामध्ये, घराच्या आसपास कोठेही पाणी साचणार याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यात तसेच जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर अशा अडगळीतील वस्तूंमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे तातडीने पाण्याचा निचरा करावा. लेप्टोच्या प्रतिबंधासाठी पावसाच्या साचलेल्या पाण्याच्या संपर्कात येणे टाळा. गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळा, पाणी उकळून प्या. तसेच नागरिकांनी ताप आल्यास घराजवळीला महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि रुग्णालयामध्ये जाऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.
गर्दीच्या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने फिरत असल्याने बाहेरचे खाणे टाळावे. पायाला जखम असल्यास चिखल किंवा साचलेल्या पाण्यात पाय न देण्याची खबरदारी घ्यावी. महापालिकेकडून मंडप परिसर आणि नागरी वस्तीत धूर फवारणी वाढवून नागरिकांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.