पुन्हा डोके वर काढत आहे मलेरिया!

Published on
Updated on

डॉ. संजय गायकवाड

मलेरियाचा फैलाव आणि मलेरियाच्या विषाणूंमध्ये औषधांना प्रतिरोध करण्याची आलेली शक्ती ही जगाच्या दृष्टीने डोकेदुखी आहे. मलेरियाचा प्रसार करणारा अ‍ॅनाफेलिस डास पाण्याच्या टाक्या आणि खड्ड्यातील पाण्यावर प्रजनन करतो. त्यामुळे साफसफाई तसेच डासांचा नायनाट करणे, हेच या आजारापासून बचावाचे महत्त्वाचे साधन ठरते; परंतु आपल्याकडील शहरांच्या पालिकांनी साफसफाई आणि कीटकनाशक फवारणीची जी कामे वेळच्या वेळी करणे अपेक्षित आहे, तीसुद्धा वेळेवर होत नाहीत. सरकारी यंत्रणासुद्धा आजाराचा फैलाव वाढल्यानंतरच जागी होते. 

दर पावसाळ्यात जगभरात मलेरियाचे तब्बल 22 कोटी रुग्ण आढळून येतात. हुडहुडी, थंडी वाजून येणे आणि तीव्र ताप ही मलेरियाची लक्षणे आहेत. मलेरियावर वेळीच योग्य उपचार मिळाले नाहीत, तर तो गंभीर स्वरूप धारण करतो. सर्वात चिंतेची बाब अशी की, मलेरियाशी दोन हात करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेली औषधे हळूहळू प्रभावहीन ठरू लागली आहेत. मलेरियाचे विषाणू या औषधांचा मुकाबला करण्याइतपत सक्षम झाले आहेत. म्हणजेच, या औषधांचा त्यांच्यावर परिणामच होत नाही. कंबोडियापासून लाओस, थायलंड आणि व्हिएतनामपर्यंत अनेक देशांत मलेरियाच्या रुग्णांना दिली जाणारी प्राथमिक औषधे प्रभावहीन ठरत आहेत. विशेषतः, औषधे प्रभावहीन ठरल्याची उदाहरणे कंबोडियात अधिक प्रमाणात समोर आली आहेत. 

भारतासारख्या दक्षिण आशियाई देशाबद्दल बोलायचे झाल्यास, 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या वर्ल्ड मलेरिया रिपोर्टनुसार, भारतात मलेरियाच्या रुग्णांमध्ये 24 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे; परंतु मलेरियाच्या जगभरातील रुग्णांपैकी सत्तर टक्के रुग्ण अकरा देशांमध्ये आढळून येतात, त्यात भारताचा समावेश आहे. गेल्या वर्षी भारतात मलेरियाच्या रुग्णांमध्ये 24 टक्क्यांनी घट झाली असल्यामुळे मलेरियाचा प्रकोप सहन करणार्‍या जगातील प्रमुख तीन देशांच्या यादीत आता भारताचा समावेश होत नाही. अर्थात, आजही भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 94 टक्के लोकांना मलेरिया होण्याचा धोका मात्र संभवतो. आजकाल डासांच्याही अशा नव्या प्रजाती निर्माण झाल्या आहेत, ज्यांच्यावर विषारी रसायनांचाही लवकर परिणाम होत नाही. त्यामुळे डास चावल्याने होणार्‍या आजारांच्या प्रकोपाने भारताची मोठी लोकसंख्या त्रस्त आहे. 

मलेरियाबरोबरच डेंग्यू, मेंदूज्वर (इन्सेफेलायटिस), चिकुनगुनिया आणि फायलेरियासारखे आजार डास चावल्यामुळेच होतात. दरवर्षी लाखो लोकांना मलेरिया होतो आणि हजारो लोक डेंग्यूमुळेही दगावतात. काही राज्यांमध्ये मेंदुज्वराचा प्रकोप झाल्यानेही मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतात. डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे आजार एडिस डासाच्या चावण्यामुळे होतात. हा डास काळ्या-पांढर्‍या रंगाचा असतो आणि कूलर, भांडी किंवा टाकीतील साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. मेंदुज्वराचा प्रसार करणारा क्युलेक्स विश्नुई डासाची उत्पत्ती भाताच्या शेतात होते. त्यामुळे भाताच्या शेतात जाण्यास लहान मुलांना मज्जाव करून या आजाराचा फैलाव बर्‍याच अंशी रोखता येऊ शकतो. 

मलेरियाचा फैलाव करणारा एनाफेलिस डाससुद्धा टाक्या आणि खड्ड्यांत साचलेल्या पाण्यावर प्रजनन करतो. त्यामुळे स्वच्छता हाच या आजारापासून बचावाचा प्राथमिक उपाय आहे. अर्थात, डासांचा नायनाट केला, तरच या भयावह आजारांपासून पूर्ण मुक्ती मिळणे शक्य आहे; परंतु आपल्याकडील अनेक शहरांच्या पालिकांकडून साफसफाईचे आणि कीटकनाशकांची फवारणी करण्याचे जे आवश्यक काम केले जायला हवे, तेही वेळेवर केले जात नाही. सरकारी यंत्रणेलासुद्धा रोगाचा फैलाव प्रचंड प्रमाणात झाल्यानंतरच जाग येते.

या डासांपासून पसरणार्‍या आजारांसंबंधी आणखी एक अडचण म्हणजे पाश्चात्त्य, प्रगत देशांमध्ये हे आजार होत नसल्यामुळे त्यांच्या नायनाटासाठी मदत करण्यास ते देश तयार नाहीत. त्यामुळे या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधनाचे किंवा औषध निर्मितीचे काम त्या देशांमध्ये होत नाही; परंतु सध्या अमेरिका आपल्या सैनिकांच्या बचावासाठी या आजारांवर संशोधन करीत आहे. 

अमेरिकेच्या नौदल संशोधन केंद्राने नवीन डीएनए लस प्रणाली विकसित केली आहे. 1998 मध्ये केलेल्या यशस्वी चाचण्यांनंतर असे सांगण्यात आले की, मलेरियाचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून एक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कारण, अमेरिकी नौदलातील जवान मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या संसर्गजन्य आजारांना बळी पडण्याची शक्यता आहे. मलेरियावरील उपचारांत वापरण्यात येणार्‍या क्लोरोक्विन या औषधाचा विकास भारत आणि वॉल्टर रीड सेवा संशोधन संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांमधून करण्यात आला आहे; परंतु अनेक दशके संशोधन करूनसुद्धा मलेरियावर प्रभावी लस तयार करण्यात अद्याप यश आलेले नाही.

सुरुवातीला मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी काही ठिकाणी कुनॅनच्या गोळ्या रुग्णांना देऊन बचाव करण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्या प्रयत्नांनाही पुरेसे यश मिळाले नाही. या औषधाचा परिणाम काही काळच टिकतो आणि पुन्हा आजार फैलावायला सुरुवात होते. मग ही साथ आटोक्यात आणणे दुरापास्त होऊन बसते. यानंतर काही आणखी औषधे तयार करण्यात आली. त्यात क्लोरोक्विन, प्रोगवालिन, प्राइमाक्विन आणि पायरोमेथागिन या औषधांचा समावेश आहे. 1938 मध्ये किडेमकोडे मारण्यासाठी डीडीटीचा शोध लागला होता. या शोधामुळे मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी एक प्रभावी हत्यार लाभले होते; परंतु भारत आणि आफ्रिकेसारख्या उष्ण कटिबंधीय देशांमध्ये ही मोहीम मोठ्या प्रमाणावर चालू ठेवणे शक्य झाले नाही. कारण, त्यासाठी कुशल प्रशासन, पैसा आणि साधनसामग्री उपलब्ध होऊ शकली नाही; परंतु याचदरम्यान असेही समजले की, डीडीटीचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. याचे सर्वात मोठे कारण असे सांगण्यात आले की, अ‍ॅनाफेलिस डास डीडीटीसह आणखी काही कीटकनाशकांना प्रतिरोध करण्यास सक्षम झाले आहेत. दुसरीकडे, मलेरियाच्या विषाणूंवर प्रोग्वालिन, पायरोमेथागिन अशा प्रचलित औषधांचाही परिणाम होईनासा झाला. याव्यतिरिक्त मलेरियाच्या विषाणूंच्या आणखी काही प्रजाती विकसित झाल्या आणि त्यांच्यावर क्लोरोक्विनचाही परिणाम होईनासा झाला. वस्तुतः, क्लोरोक्विन हे मलेरियावरील आतापर्यंतचे सर्वात प्रभावी औषध मानण्यात आले होते. 

'इंडिया स्पेस'च्या एका अहवालानुसार, मलेरियाच्या रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात ओडिशाला यश मिळाले असून, तो या आजाराशी लढण्यात आलेल्या यशाचा परिणाम आहे. तत्पूर्वी, भारतातील मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण ओडिशातील असत. कंबोडियात मलेरियाशी लढण्यासाठी आर्टेमिसिनिन आणि पिपोराक्विन या दोन औषधांचा वापर केला जातो. ही औषधे कंबोडियात 2008 मध्ये आणण्यात आली होती; परंतु 2013 मध्ये कंबोडियाच्या पश्चिम भागात मलेरियाचा असा रुग्ण आढळून आला, ज्यावर या औषधांचा परिणामच होत नव्हता. तात्पर्य, या औषधांना प्रतिकार करण्याची शक्ती मलेरियाच्या विषाणूंमध्ये विकसित झाली होती. एका अहवालानुसार, आग्नेय आशियातील काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. जेव्हा त्यातील विषाणूंच्या डीएनएची चाचणी घेण्यात आली, तेव्हा लक्षात आले की, हे विषाणू औषधांना प्रतिकार करू लागले असून, हा प्रभाव कंबोडियापासून लाओस, थायलंड आणि व्हिएतनामपर्यंत पोहोचला आहे. या सर्व देशांमध्ये 80 टक्के मलेरियाच्या विषाणूंवर औषधांचा परिणाम होईनासा झाला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या क्लिनिकल रिसर्च युनिटने व्हिएतनाममध्ये केलेल्या संशोधनानुसार, मलेरियाच्या विषाणूंमध्ये औषधांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण झाल्यामुळे पर्यायी उपचार पद्धत स्वीकारणे आवश्यक झाले आहे. आता मलेरियाच्या रुग्णांना आर्टेमिसियम या औषधासोबतच अन्य औषधे देणे तसेच तिहेरी औषधांचे मिश्रण करून देणे हाच उपाय शिल्लक राहिला आहे.

जगाला मलेरियापासून मुक्त करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना या विषाणूंच्या वाढत्या शक्तीमुळे धक्का बसला आहे. सर्वात मोठे संकट असे की, हे शक्तिशाली विषाणू आफ्रिकेत पोहोचले तर काय होईल, याची धास्ती जगाला आहे. तिथे तर मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक प्रमाणात आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. ओलिवियो मियोट्टो यांच्या म्हणण्यानुसार, विषाणूंची ही प्रतिकारशक्ती प्रभावीपणे वाढत असून, नवनवीन विभागांमध्ये जाऊन हे विषाणू नवनवीन जनुकांचा स्वीकार करण्यास सक्षम होत आहेत. जर हे विषाणू आफ्रिकेत पोहोचले, तर त्याचे परिणाम भयावह असतील. कारण, मलेरिया ही आफ्रिकेतील सर्वात मोठी समस्या आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन आणि ट्रॉपिकल मेडिसिनचे प्रा. कॉलिन सदरलँड यांच्या मते, विषाणू औषधाला दाद देत नाहीत, ही परिस्थिती एका गंभीर समस्येचे मूळ आहे; मात्र याला जागतिक संकट मानता येणार नाही. याचे आपल्याला अपेक्षित असलेले भयावह परिणाम होणार नाहीत, असे त्यांचे मत आहे; परंतु तरीही विषाणू जर औषधाला सरावत असतील तर मलेरिया ही जगाच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी आहे, हे निश्चित. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news