Malad bridge garbage pudhari photo
मुंबई

Malad bridge garbage : मालाड रेल्वे पादचारी पुलाची दुरवस्था

‘स्वच्छ रेल, स्वच्छ परिसर’चा नारा कागदावरच?

पुढारी वृत्तसेवा

मालाड : मालाड पश्चिम व पूर्व भागाला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून पुलावर ठिकठिकाणी कचरा साचल्याने प्रवासी व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कांदिवलीच्या दिशेला असलेल्या या पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जिन्यांची मागील अनेक दिवसांपासून साफसफाई झालेली नसल्याचा आरोप पादचाऱ्यांनी केला आहे.

‘स्वच्छ रेल, स्वच्छ परिसर’ असा संदेश देणाऱ्या रेल्वे प्रशासनालाच मालाडच्या या पादचारी पुलाची अस्वच्छता दिसत नाही का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. पुलावर कचरा साचल्याने दुर्गंधी निर्माण झाली असून, अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांत नाराजी वाढत आहे.

पुलाच्या परिसरात भटके श्वान व मांजरे आश्रय घेत असल्याचे चित्र दिसत असून पादचारी या पुलाचा वापर करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यातच गुटखा व पान खाऊन पुलाच्या जिन्यांवर सर्रास थुंकण्यात येत असल्याने संपूर्ण जिना थुंकीच्या लाल डागांनी रंगलेला आहे.

दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या मालाड रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी पुलाची अशी अवस्था असेल, तर रेल्वे प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेचे नेमके फलित काय, असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी निधी व यंत्रणा उपलब्ध असतानाही प्रत्यक्षात पुलाची नियमित साफसफाई होत नसेल, तर संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन पादचारी पुलाची संपूर्ण स्वच्छता करावी, जिन्यांची नियमित साफसफाई करावी तसेच भटक्या प्राण्यांचा वावर रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT