मुंबई : पंधरा वर्षीय मुलीवर तिच्याच परिचित 55 वर्षांच्या आरोपीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह विनयभंग, पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत मुलगी मालाड परिसरात राहते. याच परिसरात एक किराणा होलसेल दुकान असून याच दुकानात आरोपी कामाला आहे. 19 डिसेंबरला ती आरोपी काम करत असलेल्या दुकानात गेली होती. तिथे त्याने तिच्यासोबत फोटो काढला होता. तो फोटो इतरांना दाखवून बदनामीची धमकी त्याने मुलीला दिली. त्यानंतर तिला मालाडच्या चिंचोली फाटक येथे आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
19 डिसेंबर ते 26 डिसेंबरदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला असून शुक्रवारी या मुलीने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी आरोपीविरुद्घ दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच त्याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत आहे.