शाळकरी मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून शरीरसुखाची मागणी pudhari photo
मुंबई

Mumbai Crime : शाळकरी मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून शरीरसुखाची मागणी

47 वर्षीय आरोपीला मालाडमध्ये ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

मालाड : मालाड परिसरात एका 47 वर्षीय विकृत व्यक्तीने शाळेत जाणाऱ्या अवघ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला अश्लील व्हिडीओ दाखवल्याचा अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ व्हिडीओ दाखवून हा नराधम थांबला नाही, तर त्याने या मुलीकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेत मालाड पोलिसांनी सुनील पवार नावाच्या 47 वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपी सुनील हा कांदिवली पश्चिम येथील रहिवासी असून शाळेत ये-जा करणाऱ्या लहान मुलींना हेरून त्यांचा पाठलाग करणे आणि संधी मिळताच त्यांना मोबाईलवर अश्लील क्लिप्स किंवा पॉर्न चित्रपट दाखवणे, अशी त्याची कार्यपद्धती असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

नुकत्याच घडलेल्या या घटनेत, आरोपीने मालाडमध्ये राहणाऱ्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलीला गाठले. तिला बळजबरीने अश्लील व्हिडीओ दाखवला आणि त्यानंतर माझ्यासोबत चल असे म्हणत तिच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करू लागला. या अनपेक्षित आणि भयानक प्रसंगाने घाबरलेल्या मुलीने आरोपीच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट घर गाठले. घरी पोहोचल्यावर रडतच तिने आपल्या आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

मुलीच्या पालकांनी क्षणाचाही विलंब न करता मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आणि त्याला मालाड परिसरातूनच अटक करण्यात आली.

आरोपी सुनील पवार याने यापूर्वीही इतर मुलींसोबत अशा प्रकारचे विकृत वर्तन केले असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस त्या दृष्टीने अधिक सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT