मालाड : मालाड परिसरातून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन फळ विक्रेते फळांना उंदरांपासून वाचवण्यासाठी‘रेटिनॉल’(उंदीर मारण्याचे औषध) लावून त्यांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मनोज कुमार केसरवानी, बिपिन केसरवानी अशी दोघांची नावे आहेत. त्यांचे दुकान सील केले आहे.
उत्तर भारतीय फळ विक्रेता फळांवर ‘रॅटोल’ हे उंदीर मारण्याचे औषध लावत असल्याचा प्रकार मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला. मनसेचे कार्यकर्ते कुणाल साळुंखे यांनी काही दिवस पाळत ठेवून संबंधित विक्रेत्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ मालाड पोलीस ठाण्यात सादर करण्यात आला. तक्रारीचे गांभीर्य ओळखून मालाड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली. चौकशी दरम्यान, आरोपींनी आपली चूक कबूल केली
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसेचे उपविभाग सचिव जब्बार शेख यांनी मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर कठोर कारवाईची मागणी केली. मुंबईत फेरीवाला मुक्त मोहिमेची घोषणा झाली होती. मात्र परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांची सखोल चौकशी करून अशा कृत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.