Malad Fake Baba Arrested Pudhari
मुंबई

Malad Fake Baba Arrested: मालाडचा भोंदूबाबा मॉन्टी गजाआड; अंघोरी पूजेसाठी मागवायचा बकऱ्याचे काळीज, दारू अन् स्मशानातील राख

अंगात दैवी शक्ती येते, असा दावा करून तो अनेकांना अनेक इलाज सुचवायचा.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: व्यक्तिगत आजारांपासून आयुष्यातील प्रत्येक प्रश्नावर झटपट इलाज देणारा आणि अंगात देव आला म्हणून घुमत घुमत भक्तांना घुमवणारा मालाडचा भोंदूबाबा रिदम अशोक पांचाळ ऊर्फ मॉण्टी यास पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर विविध गुन्हे दाखल केले आहेत. बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

अघोरी पूजेसह अंधश्रद्धेच्या नावाने रिदम पांचाळकडून भक्तांची फसवणूक सुरू होती. त्याच्या चौकशीत अनेक गोष्टींचा पर्दाफाश होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी व्यक्त केली. रिदम हा मालाड येथील मंचुभाई रोड, बीएमसी गार्डनजवळील शिव सदन चाळीत राहतो. पूर्वी तो जिम ट्रेनर होता. काही महिन्यांपूर्वी त्याने जिम ट्रेनरची नोकरी सोडली. स्वत:च्या घरीच त्याने भोंदूगिरीचा धंदा सुरू केला.

अंगात दैवी शक्ती येते, असा दावा करून तो अनेकांना अनेक इलाज सुचवायचा. अंघोरी पूजेसाठी तो दारू, सिगारेट, स्मशानातील राख, लिंबू, बकऱ्याचे काळीज अशा वस्तू मागवत होता. नोकरीत यश, घरातील अनिष्ट दूर करण्यासाठी, आजारपणावर इलाज म्हणून पूजा केलेले साहित्य तीन रस्ता किंवा चौकात टाकण्याचा सल्ला तो देत होता.

त्याच्या सांगण्याप्रमाणे गोष्टी केल्या नाहीत तर जिवाचे बरे-वाईट होईल, अशी धमकी देत होता. आपल्या अंगात भैरव येत असल्याचे सांगून त्याने अल्पावधीत मोठी प्रसिद्ध मिळवली. अलीकडे तर तो महानगरपालिकेच्या बागेतही खुलेआम दरबार भरवू लागला.

या भोंदूचे भांडे फोडले ते मालाडचे व्यावसायिक अनोश एडल मोरेना यांनी. त्यांनी या भोंदूचे थेर पाहिले आणि दिंडोशी पोलिसांत तक्रार दिली. रिदमविरुद्ध गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस निरीक्षक शरद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सुरवसे, सहाय्यक फौजदार मोरे, पोलीस हवालदार शंकर माईंगडे, हेमंत रोडे, मंगेश लोंढे, समरेश भोगले, पोलीस शिपाई झिंबल यांनी बुधवारी त्याला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT