मुंबई: दहिसरपासून ते गोरेगावपर्यंत प्रस्तावित असलेल्या १२० फूट डी.पी. रोड प्रकल्पामुळे मालाड परिसरातील १७०० हून अधिक नागरिक बाधित होणार आहेत.
लोखंडवाला परिसरापासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग हॉटेल परिसराला जोडणाऱ्या या रस्त्याच्या मार्गात मालाडमधील लोखंडवाला परिसरात असलेल्या क्रांतीनगर आणि आप्पा पाडा या भागांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे काम तीन ते चार टप्प्यांत करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
पहिल्या टप्प्यातील ६० चौ.फूट रस्त्याच्या कामासाठी आतापर्यंत महापालिकेकडून (बीएमसी) १४० नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांमध्ये बाधित नागरिकांना लोखंडवाला तसेच ठाकूर व्हिलेज येथील महादेव अपार्टमेंटमध्ये २२५ चौरस फुटांची घरे देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, या संपूर्ण प्रक्रियेची पुरेशी पूर्वकल्पना न देता, ९ ऑक्टोबर रोजी घरांच्या वाटपासाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नागरिक लॉटरी प्रक्रियेसाठी उपस्थित राहिले नाहीत तरीही लॉटरी काढली जाणार असल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, २०१८ च्या शासन निर्णयानुसार (जीआर) पात्र बाधित नागरिकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणे अपेक्षित आहे. असे असताना महापालिकेकडून केवळ २२५ चौरस फुटांची घरे देण्याचा निर्णय का घेण्यात येत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
३०० चौरस फुटांच्या घरांऐवजी २२५ चौरस फुटांची घरे देण्याच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बीएमसी प्रशासनाने २०१८ च्या शासन निर्णयानुसार बाधित नागरिकांना न्याय द्यावा, तसेच घरांच्या वाटपासाठी लॉटरी प्रक्रिया राबवण्यापूर्वी नागरिकांच्या हरकती, आक्षेप व मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
परंतु मालाड पालिका पी/ उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्याना ठाकूर व्हिलेज येथील (२२५) फुटाचे घर घ्यायचे असेल त्यांच्यासाठी दि.२९ ऑक्टोंबर शुक्रवारी लकी ड्रॉ काढून ४०ते ५० नागरिकांना अलॉटमेंट नाव डिक्लेअर करण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांनी ३०५ चौ. फुटाच्या घराची मागणी केली आहे.
लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी
ठाकूर व्हिलेज येथील महादेव अपार्टमेंट इमारत २००९ च्या (जी आर) नुसार १५ ते २० वर्षे जुनी इमारत असल्याने या इमारतीत जाण्यासाठी बाधीत नागरिक नकार देत आहेत जुन्या बिल्डिंग मध्ये आम्हाला स्थलांतरित का केले जात आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून आम्हाला आमच्या परिसरात पीपी अंतर्गत घरी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
क्रांतीनगर व आप्पा पाडा परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेविका व आमदार यांनी नागरिकांच्या म्हणण्यानुसार नागरिकांच्या बरोबर राहून शासनाला सांगून ३०५चौ. फुटाचे घर देण्याची मागणी करायला पाहिजे होती परंतु असे होत नसल्यामुळे नागरिक वार्ड क्र. ३९ च्या नगरसेविका पुष्पा कळंबे आणि आ. सुनील प्रभू यांच्यावर नाराज असल्याचा सूर नागरिकांतून ऐकायला मिळत आहे.