मुंबई : माहीम येथील एल. जे. रोडवरील शोभा हॉटेल जंक्शनजवळ असलेल्या पी. सी. जैन ज्वेलर्स दुकानावर बुधवारी संध्याकाळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि दोघेही पसार झाले. सायंकाळी रात्री ७.३० ते ७.३५ च्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडूनही यात कुणीही जखमी झाले नाही. दुकानाचे मालक भरत जैन यांच्यासह कर्मचारी सुरक्षित असून, कोणालाही दुखापत झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी दुकानाच्या दिशेने पाच ते सहा गोळ्या झाडल्या.हेल्मेट परिधान केलेले हे दोघे दुचाकीवरून आले होते. सीसीटीव्हीमध्येही ते दुकानाजवळ थांबताना दिसतात आणि गोळ्या झाडून पसार होतानाही दिसतात. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी दुकानातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले जात आहे. हल्लेखोर कोणत्या मार्गाने आले आणि गोळीबारानंतर कुठे पसार झाले, याचा माग काढला जात आहे.
गोळीबार करणारे दोघेच होते की त्यांच्यामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे, याचाही तपास पोलीस करीत आहेत. सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने आणि परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
न्यायवैद्यक पथकालाही पाचारण करण्यात आले. खंडणीच्या वादातून व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा गोळीबार केला असावा, असा प्राथमिक संशय आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दादर ते सांताक्रूझदरम्यान विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली.
अलीकडे मुंबईत बॉलीवूडच्या चित्रताऱ्यांना धमक्या आल्या. त्यात प्रामुख्याने बिष्णोई गँगचा हात असावा, असे म्हटले जात असतानाच हा गोळीबार झाला. सराफामधून खंडणी वसूल करण्यासाठीच हा गोळीबार झाला असावा, या अंदाजाने सराफा बाजारात चिंतेचे वातावरण आहे.