मुंबई: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बैठक होऊनही विधान परिषदेच्या या जागावाटपाचे घोडे अजून अडले आहे. महायुतीत शिंदे गट आणि सुनेत्रा पवार गटाने जास्त जागांवर दावा केल्याने जागावाटप अडकले आहे.
विधान परिषदेच्या जागावाटपात भाजपने सुरुवातीला 14 जागांवर दावा केला होता, तर केवळ तीन जागा शिंदे गटाला आणि सुनेत्रा पवार गटाला एक जागा देण्याचे ठरविले होते; पण जशी जागावाटपाची बोलणी सुरू झाली, तशी शिंदे गटाने सहा, तर सुनेत्रा पवार गटाने तीन जागांची मागणी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक झाली; पण त्यात यावर तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मुंबईत परतले असले, तरी अद्याप त्यांच्यात बैठक झालेली नाही.
ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर-जालना, यवतमाळ आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड आणि हिंगोली-परभणी अशा सहा जागांवर शिंदे गटाचा दावा आहे. यामध्ये सिंधुदुर्ग-रत्नागगिरी-रायगड या जागेवरून शिंदे गटाचा सुनेत्रा पवार गटाशी संघर्ष सुरू आहे.
येथे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले, सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध तटकरे असा संघर्ष रंगणार, असेे चित्र आहे.ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्यास भाजपच्या तेथील आमदारांचा विरोध आहे.
पुणे आणि हिंगोली-परभणी या जागांसाठीही सुनेत्रा पवार गट आग्रही आहे. जागावाटप झाले नाही तर भाजप आणि शिंदे गट यांच्यात अनेक जागांवर संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीला विधान परिषदेच्या सर्व 17 जागा सहज जिंकू असे भाजपला वाटत होते; पण शिंदे गट अनेक जागांवर आक्रमक भूमिका घेईल, असे या गटाचे नेते बोलत आहेत.
भाजप 10 ते 11 जागा लढविण्याची शक्यता
भाजपचे नेते सुरुवातीला 14 जागा लढवणार, असे सांगत होते; पण आता 10 किंवा 11 जागा भाजप लढवेल आणि सहा जागा शिंदे गट आणि सुनेत्रा पवार गटाला देईल, असे संकेत आहेत.