Mahayuti Seat Sharing‌ Pudhari
मुंबई

Mahayuti Seat Sharing‌: ‘छत्रपती संभाजीनगर‌’वरून महायुतीचे जागावाटप अडले

फडणवीस-शिंदे बैठकीत अंतिम तोडग्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीमधील जागावाटपाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, एकूण 16 पैकी 15 जागांचे वाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर-जालना या एका जागेवरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये अजूनही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 1 जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील अंतिम चर्चेत या जागेचा फैसला होईल.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांत 14 ठिकाणी भाजपचे स्पष्ट वर्चस्व असतानाही महायुतीमधील मित्रपक्षांनी अधिक जागांचा आग्रह धरला आहे. त्यामुळे 16 जागांपैकी भाजप 11 जागांवर, शिवसेना 4 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

पोटनिवडणूक असलेली नागपूरची जागा भाजपकडे कायम राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाकडे ठाणे, यवतमाळ, नाशिक आणि परभणी-हिंगोली या चार जागा येण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (कोकण) या दोन जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

दरम्यान, महायुतीत छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघाचा तिढा कायम आहे. या जागेवरील आपला आग्रह शिंदे गट आणि भाजपने कायम ठेवला आहे. स्थानिक समीकरणांमुळे दोन्ही पक्ष सहजासहजी माघार घेण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे येत्या काही तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होणाऱ्या अंतिम चर्चेत या जागेचा फैसला होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

सांगली-सातारा-सोलापूर भाजपकडे

तर, उर्वरित जागांवर भाजप स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे. यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती आणि धाराशिव-लातूर-बीड या जागांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत विजयी झाल्यामुळे त्यांनी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे जाहीर झालेली नागपूरची पोटनिवडणूक ही भाजपची हक्काची जागा असून, तीदेखील भाजपच्याच वाट्याला गेली आहे.

कोकणात ‌‘मविआ‌’कडून बाळ माने

कोकणच्या जागेवर ‌‘उबाठा‌’चे उपनेते बाळ माने यांची उमेदवारी जाहीर झाल्याने ही निवडणूक आता थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे. | वृत्त पान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT