मुंबई : नरेश कदम
महापालिका निवडणुकीपासून भाजप आणि शिंदे गटातील मतभेदाची दरी वाढत चालली असून, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे शिवसेेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी सोमवारी होणाऱ्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुतीची ही बैठक पुढे ढकलण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. तसेच, शिंदे गटाच्या दोन सदस्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष निवडून आला. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हा मुद्दा लावून धरला. शिंदे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निलंबित करण्याची मागणी केली असली, तरी त्यांचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याकडे होता.
शिंदे गटात सातारा घटनेचा राग
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शैलीत चौकशीचे आश्वासन देऊन विषयावर पडदा टाकला आहे. मात्र, शिंदे गटात सातारा घटनेचा राग धुमसत आहे.
निवडणुकीचे सर्वाधिकार
जयकुमार गोरे यांना
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी ‘रायगड’ बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांची समन्वय समितीची बैठक बोलावली होती. रवींद्र चव्हाण हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांना सातारा घटनेची माहिती नव्हती. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निवडणुकीचे सर्वाधिकार ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आले होते.
बहिष्काराचा निर्णय शिंदेंचा
महायुतीच्या बैठकीबाबत भाजपकडून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे
गटांच्या नेत्यांना निरोप गेले होते. शिंदे शिवसेनेचे उदय सामंत हे समन्वय समितीचे सदस्य आहेत; पण या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
महामंडळे व समित्यांवरील नियुक्त्या रखडल्या
महायुतीतील तीन पक्षांतील वादाच्या मुद्द्यावर चर्चा या बैठकीत होणार होती. त्याचप्रमाणे सरकारी महामंडळे आणि समित्यांवरील राजकीय नियुक्त्यांवर या बैठकीत चर्चा होणार होती. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तारूढ होऊन दीड वर्ष झाले आहे. तरी तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या महामंडळे आणि समित्यांवरील नियुक्त्यांसाठी आग्रही आहेत. परंतु, सातारा आणि खरात प्रकरणाने भाजप आणि शिंदे गटात चांगलेच मतभेद निर्माण झाले आहेत.