IPL 2025 RCB celebration Bangalore stampede |
मुंबई : १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 'आयपीएल' स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाचा परमोच्च आनंद क्षणभंगुर ठरला. 'आरसीबी' संघाचा अचानक ठरवण्यात आलेला विजयोत्सव पाहण्यासाठी बुधवारी हजारो चाहत्यांनी बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ५० हून अधिक चाहते जखमी आहेत. दरम्यान, या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील एक तरुण थोडक्यात बचावला आहे.
'आरसीबी' संघाचा विधान भवनासमोर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. त्यामुळे सुमारे एक लाख चाहत्यांनी स्टेडियमकडे धाव घेतल्यानंतर स्टेडियमबाहेर गर्दी होऊन ही चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत छत्रपती संभाजीनगरचा रवी पाटील हा तरुण थोडक्यात बचावला आहे. रवी पाटील हा आरसीबीच्या विजयोत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी बेंगळुरूमध्ये गेला होता. त्यावेळी झालेल्या गर्दीत तो अडकला. मात्र वेळीच तो भींतीवरून उडी मारून बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. तो तिथून बाहेर कसा पडला, याबाबत त्याने व्हिडिओ शेअर करून माहिती दिली आहे.
आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने या दुर्घटनेसंदर्भात पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोहलीने इन्स्टाग्रामवर आरसीबी टीमच्या अधिकृत निवेदनासह स्वतःचा एक भावनिक संदेशही शेअर केला."शब्दच सापडत नाहीत... अंत:करणातून व्यथित आहे, " असे त्याने म्हटले आहे.