Women Colleges Degree  Pudhari
मुंबई

Maharashtra Women Colleges: राज्यात 38 नव्या महिला महाविद्यालयांना मंजुरी; शिक्षणाला मोठी चालना

27 महाविद्यालये एसएनडीटीशी संलग्न; ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मोठा लाभ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात महिला शिक्षणाला चालना देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 27 महिला पदवी महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ही सर्व महाविद्यालये मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाशी संलग्न असणार आहेत. राज्यात एकूण 38 नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली असून, त्यामध्ये महिला महाविद्यालयांचा मोठा वाटा आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 अंतर्गत ‌‘नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली‌’ (एनसीपीएस) द्वारे विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. निकषांची पूर्तता करणाऱ्या 38 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 27 महाविद्यालये एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न असतील, तर नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न 8 महाविद्यालयांनाही मान्यता मिळाली आहे. याशिवाय जळगाव, अमरावती आणि छ. संभाजीनगर येथील प्रत्येकी एका महाविद्यालयालाही मंजुरी देण्यात आली आहे. ही सर्व महाविद्यालये कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू करण्यात येणार असून संबंधित संस्थांना ‌‘इरादापत्र‌’ देण्यात आले आहे.

ग्रामीण आणि निमशहरी भागात ही महाविद्यालये सुरू होणार असल्याने विद्यार्थिनींना घराजवळच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. नव्या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे विविध अभ्यासक्रम सुरू होणार असून बीएस्सी (विज्ञान व तंत्रज्ञान), बीएस्सी (होम सायन्स), बीए (मानव विज्ञान) आणि बीकॉम (व्यवस्थापन) या अभ्यासक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

अन्यथा मान्यता रद्द करणार

मंजुरी देताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काही कडक अटी घातल्या आहेत. त्यानुसार संबंधित संस्थांना इरादापत्रातील सर्व अटी निर्धारित कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक आहे. अंतिम मान्यता मिळाल्याशिवाय महाविद्यालयांना विद्यापीठाशी संलग्नता मिळणार नाही. तसेच केवळ इरादापत्राच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास इरादापत्र रद्द करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT