Maharashtra Weather Update
राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोर सुरु आहे. राज्यातील अनेक भागात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. यादरम्यान ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.
मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल. कोकण-गोव्यातील काही ठिकाणीही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशीव जिल्ह्यात उद्या १५ मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर आणि जिल्ह्यातील घाट क्षेत्रातही पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचे हवामान केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
पुणे आणि पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि नाशिक घाट क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
ताज्या उपग्रह निरीक्षणानुसार महाराष्ट्रातील संपूर्ण उत्तर दक्षिण घाट परिसर ढगांनी व्यापलेला आहे. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही भागांमध्येही अशीच परिस्थिती आहे. येत्या काही तासांत या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राच्या काही भागात नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे मान्सून त्याच्या नियोजित आगमन वेळेच्या किमान एक आठवडा आधी अंदमानात दाखल झाला आहे. तो पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या अधिक भागांमध्ये पुढे सरकेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाच्या मान्सूनच्या वेळापत्रकानुसार, दक्षिण अंदमान समुद्र, पोर्ट ब्लेअर आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख २१ मे आहे. पण त्याचे आठ दिवस आधीच आगमन झाले आहे. दरम्यान, १४ मे रोजी मान्सूनची प्रगती रेषा आहे त्याच स्थितीत आहे.