Maharashtra Weather Update :
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृष्य पावसामुळं अतोनात नुसाकान झालं आहे. त्यामुळं राज्यातील लोकं हा पाऊस कधी थांबणार अशी भावना व्यक्त करत आहेत. आज (१७ सप्टेंबर) रोजी देखील महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं (IMD) वर्तवली आहे. हवामान खात्यानं पुढचे २ ते ३ दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडला होता. आज मुंबईत ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईत कमाल तापमान हे २९ डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान हे २४ डिग्री सेल्सियस इतकं राहण्याची शक्यता आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यामध्ये जारदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुणे, सातारा, सांगली, आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्यानं यलो अलर्ट दिलेला नाही. मात्र दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. आजही १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील ८ ही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानं या विभागातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. इथं ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर इथं हवामान खात्यानं विशेष असा कोणताही अलर्ट दिलेला नाही. मात्र नाशिक, जळगाव, धुळे आणि नुंदरबार इथं पावसाच्या मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्यानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार विदर्भ - तेलंगाना सीमेवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात तुफान पाऊस पडलाय. त्यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. जनजीवन विस्कळीत झालं होतं.
प्रशासनानं पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि गरज नसताना प्रवास करणं टाळण्याचा सल्ला दिला होता. शेतकऱ्यांना देखील त्यांच्या उभ्या पिकांना वाचवण्यासाठी खबरदारीचा उपाय करण्याचा सल्ला देण्यात आला होता.