राज्यात यंदा पाणीसाठा समाधानकारक  pudhari photo
मुंबई

Maharashtra water storage 2026 : राज्यात यंदा पाणीसाठा समाधानकारक

अल निनोचे सावट, हवामान खात्याच्या पूर्वानुमानाची महाराष्ट्राला प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत समाधानकारक असला तरी यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसपाण्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने ओढ दिल्यास टंचाई किंवा दुष्काळसदृश उपाययोजनांची तयारी सुरू आहे.

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राने समाधानकारक पाऊस अनुभवला. यंदा मात्र जागतिक तापमानवाढीमुळे अल निनोचा प्रभाव जाणविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस विलंबाने बरसू शकतो. तसेच पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता आहे. खासगी हवामान संस्थेने तसा अंदाज वर्तविल्याने चिंतेत भर पडली आहे.

सध्या राज्यातील पाणीसाठा समाधानकारक आहे. मात्र, खासगी संस्थांच्या अंदाजानुसार पाऊस लांबल्यास शहरी आणि ग्रामीण भागाला जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता वाढू शकते. अशा परिस्थितीत पाण्याचे नियोजन करावे लागू शकते. मात्र, भारतीय हवामान खात्याकडून हवामानाचा पूर्वानुमान जाहीर झाल्यानंतरच त्याला मूर्त स्वरूप मिळू शकणार असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य सरकारने मात्र संभाव्य स्थिती लक्षात घेत दीर्घकालीन उपायांसाठी तरतूद केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अर्थसंकल्प सादर करताना एल निनोचा प्रभाव पावसावर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली. आपल्या सर्वांसाठी ही गंभीर बाब असल्याचे सुचवतानाच दीर्घकालीन उपायांचा सूतोवाच केला होता. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला गती दिली जाईल, पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, तसेच जागतिक बँकेच्या सहाय्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराच्या प्रकल्पांची घोषणा करत त्यासाठी 5 हजार 860 कोटींची घोषणाही करण्यात आली.

दरम्यान, सध्या राज्यातील पाणीसाठी समाधानकारक आहे. राज्यातील सर्व प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठी तुलनेत जास्त आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील उपयुक्त पाणीसाठी 46.24 टक्के इतकाच होता. यंदा मात्र हेच प्रमाण 51.18 टक्के इतके आहे. तर, राज्याच्या विविध भागांतील टँकरची संख्याही गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील 71 गावे आणि 361 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. त्यासाठी 99 टँंकर वापरण्यात आले. यंदा मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. सध्या 19 गावे आणि 128 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून त्याकामी 6 शासकीय आणि 29 खासगी टँंकर वापरण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT