मुंबई: पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील तब्बल १० जिल्ह्यांतील २८६ गावे आणि १ हजार १८२ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे. पुढील काही दिवसात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या संकटासोबत शेतकऱ्यांना चारा टंचाईचीही चिंता वाटू लागली आहे.
ऑगस्ट महिना पूर्ण कोरडाठाक गेला असून, सप्टेंबर महिना निम्मा सरला तरीही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे भूजलपातळी आणखी खालावत असून, विहिरी, कूपनलिका आणि स्थानिक पाझर तलाव, ओढे आदी जलस्रोत कोरडे पडले आहेत.
राज्यात समाधानकारक पावसाअभावी पिके करपली आहेत. दहापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये पावसानेे ओढ दिली आहे. सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, धाराशीव, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांमध्ये पन्नास ते ७५ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत पिक परिस्थितीचे सादरीकरण
पावसाने तीन ते चार आठवड्यांचा खंड घेतला आहे. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, बाजरी अशा पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिकांच्या परिस्थितीचे सादरीकरण करण्यात आले. त्यापाठोपाठ राज्याच्या पाणी पुरवठा विभाग व स्वच्छता विभागाने पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या दहा जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ३००हून अधिक टँकरच्या फेऱ्या होत आहेत.
अहिल्यानगरमध्ये सर्वांधिक टँकर
अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक म्हणजे १०३ टँकर पाणी पुरवठा करीत आहेत. अहिल्यानगरमधील १०० गावे आणि तब्बल ५३० वाड्यातील लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. आजमितीस सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा पाथर्डी तालुक्याला बसल्या असून, नगर, शेवगाव व कर्जत तालुक्यातही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
पावसाने आणखी दडी मारल्यास टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. तर सोलापूरमधील ५४ गावे आणि २०२ वाड्यांना टँकरमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.
चारा टंचाईचे संकट
पावसाळा कालावधीत किमान सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याची तात्पुरती सोय झाली, पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतात गवत व अन्य पिक काढणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे चारा संपण्याच्या मार्गावर असल्याने पाण्यापाठोपाठ चारा टंचाईच्याही समस्येचा सामना करावा लागण्याची भीती ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.