Chandrashekhar Bawankule Pudhari
मुंबई

Chandrashekhar Bawankule: बांधकाम परवानगीवेळी गौण खनिजाची माहिती अनिवार्य,लवकरच अध्यादेश काढणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

महाखनिज २.० प्रणालीद्वारे बांधकाम परवानगी प्रक्रियेत गौण खनिजांची माहिती नोंदवून वापर रॉयल्टी आणि महसुलावर नियंत्रण ठेवण्याची योजना.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: इमारतींच्या बांधकाम परवानगीच्या प्रक्रियेतही आवश्यक गौण खनिजाची माहिती नोंदविण्याची व्यवस्था करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात येईल. यामुळे प्रत्यक्ष वापर, रॉयल्टी आणि महसूल यांचे एकत्रित संनियंत्रण शक्य होईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नवी मुंबईत स्पष्ट केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महाखनिज २.० प्रणालीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते.

यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त सिद्धाराम सालीमठ, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, अपर आयुक्त वैशाली उंटवाल, सहआयुक्त रवींद्र पवार आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, महाखनिज २.० ही केवळ तांत्रिक प्रशिक्षणाची किंवा नवीन प्रणाली वापरण्याची बाब नाही, तर गौण खनिज व्यवस्थापनातील जुनी कार्यपद्धती बदलून प्रशासनात परिवर्तन घडविण्याचा हा प्रयत्न आहे. ‘ईज ऑफ लिव्हिंग’आणि ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ या संकल्पनांना अनुसरून लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

मागील १५ वर्षांतील अवैध वाहतूक, उत्खनन आणि दंडवसुलीचा तपशीलही डिजिटल स्वरूपात आणावा. यामुळे अवैध उत्खननाची व्याप्ती आणि संबंधित कालावधीतील जबाबदारी निश्चित करणे शक्य होईल, असेही बावनकुळे म्हणाले.

तीन महिन्यांत १० लाखांहून अधिक डिजिटल परवाने

विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे ‘महाखनिज २.०’ प्रणालीची कार्यप्रणाली, उपलब्ध सुविधा आणि अंमलबजावणीचा आढावा सादर केला. प्रणालीतील विविध ॲप्स, ड्रोन, दंडवसुली, रॉयल्टी आणि वाहन नोंदणीच्या सुविधांचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत गेल्या तीन महिन्यांत १० लाखांहून अधिक डिजिटल वाहतूक परवाने (डीजीटीपी) तयार झाले असून, सुमारे ५० लाख ब्रास उत्खननासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT