TET Exam 2026 Pudhari
मुंबई

Maharashtra TET Exam: ‘नीट’नंतर पुन्हा परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; सहा लाखांहून अधिक परीक्षार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

राज्यभरातून संतापाचा उद्रेक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील लाखो शिक्षक आणि शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)च्या प्रश्नपत्रिका भिवंडीत फुटल्यानंतर आता पुन्हा राज्य हादरले आहे.

रविवारी (२८ जून) होणारी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याची नामुष्की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर ओढवली असून, तब्बल ६ लाखांहून अधिक परीक्षार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. प्रवास, निवास आणि परीक्षेच्या तयारीसाठी हजारो रुपये खर्च करून परीक्षा केंद्रांकडे निघालेल्या उमेदवारांच्या संतापाचा उद्रेक झाला असून, राज्यातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक उमेदवार शनिवारीच परीक्षा केंद्रांच्या शहरांमध्ये पोहोचले होते. काहींनी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती, तर अनेकांनी खासगी वाहने आणि रेल्वे-बस प्रवासासाठी मोठा खर्च केला होता. परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळताच परीक्षा केंद्रांबाहेर आणि सामाजिक माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या प्रकरणावरून विविध शिक्षक संघटना, शिक्षक नेते आणि राजकीय पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी सदर घटना राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेला बदनाम करणारी असल्याचे सांगत, सहा लाखांहून अधिक शिक्षक आणि उमेदवारांचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्याची प्रतिक्रिया दिली.

तीन वर्षांत परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमुळे शिक्षकांचे एक वर्ष वाया जाणार असल्याने त्यांना चार वर्षांची मुदत द्यावी, तसेच या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली.

राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी जनगणना, नवीन अभ्यासक्रम आणि विविध शासकीय जबाबदाऱ्यांमध्ये मानसिक तणावाखाली असलेल्या शिक्षकांनी या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती.

परीक्षा रद्द झाल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. शिक्षक नेते जालिंदर सरोदे यांनी पेपरफुटीच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत परीक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिक्षक महासंघाचे अनिल बोरनारे यांनी तर राज्यात टीईटी परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली.

शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते भाऊ चासकर यांनी टीईटीच्या संपूर्ण पुनर्रचनेची मागणी केली आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे तानाजी कांबळे यांनी लाखो शिक्षकांच्या भविष्याशी संबंधित अशा महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली.

शिवयुनिटी फाउंडेशनचे प्रा. बालुशा माने यांनी पेपरफुटी हा केवळ गुन्हा नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यावरचा दरोडा आहे, असे म्हणत मुख्य सूत्रधारांवर मकोका किंवा तत्सम कडक कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. शिक्षण विकास मंचचे डॉ. माधव सूर्यवंशी यांनी हजारो प्रामाणिक शिक्षकांच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची खंत व्यक्त केली.

मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ डॉ. विशाल कडणे यांनी टीईटी पेपरफोडणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरातील कठोर करण्याच्या मागणीसाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार टीका करत, राजकारणाती फोडाफोडी आणि परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ थांबवण्याची मागणी केली.

परीक्षार्थी काय म्हणतात?

आज दुपारपर्यंत आम्हाला पेपर रद्द झाल्याची कोणतीही माहिती नव्हती. माझे परीक्षा केंद्र संभाजीनगरला असल्याने नाशिकवरुन संभाजीनगरला पोहचलो अचानक परीक्षा रद्द झाल्याचे पत्र समोर आले त्‍यामुळे काय करावे हेच कळेना.

सरकारने टीईटी सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य केली आहे आणि दोन वर्षांत उत्तीर्ण होण्याची सक्ती केली आहे. अशा परिस्थितीत पेपरफुटीचे प्रकार घडत असतील, तर याला जबाबदार कोण अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने व्यक्त केली.

गेल्या अनेक महिन्यांपासून शाळेची जबाबदारी सांभाळत, घरची कामे करत अभ्यास करून आम्ही या परीक्षेची तयारी केली होती. अचानक परीक्षा रद्द झाल्यामुळे मानसिक धक्का बसल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.

परीक्षा रद्द झाल्याने आमच्या मेहनतीवर पाणी फिरले. सरकारने याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करावा, असे मत एका विद्यार्थ्याने व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT