मुंबई: येत्या २८ जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात हिजाब, बुरखा आणि दुपट्ट्याबाबत निर्माण झालेल्या वादावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सोमवारी सविस्तर स्पष्टीकरण दिले.
महिला उमेदवारांना हिजाब, बुरखा किंवा दुपट्टा परिधान करण्यास मनाई नसली, तरी परीक्षा केंद्रातील वर्गखोलीत चेहरा, कान, डोके व मानेवरील भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसणे बंधनकारक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जारी करण्यात आलेल्या नव्या परिपत्रकानुसार, परीक्षेदरम्यान सर्व केंद्रांवर ‘लाईव्ह सीसीटीव्ही’द्वारे देखरेख केली जाणार आहे. उमेदवारांची ओळख पडताळणी, बायोमेट्रिक तपासणी आणि गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असल्याचे परिषदेने नमूद केले आहे.
यूपीएससी, एसएससी, आयबीपीएस, एसबीआय, आरआरबी, गेट व क्लॅट यांसारख्या स्पर्धा परीक्षांतही असेे निर्बंध लागू असल्याचा दाखलाही देण्यात आला आहे.
परीक्षा परिषदेचे आयुक्त नंदकुमार बेंडसे यांनी कोणत्याही विशिष्ट धार्मिक पोशाखावर बंदी नसल्याचे स्पष्ट केले. मात्र परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची स्पष्ट ओळख पटणे आवश्यक असल्याने चेहरा, तोंड किंवा मानेचा भाग झाकण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
परिषदेकडून जारी केलेल्या परिपत्रकात अलीकडेच झालेल्या डीएलएड व संगणक लघुलेखन परीक्षांत काही उमेदवारांनी दुपट्टा, बुरख्यात मोबाईल लपवून आणल्याची प्रकरणे उघडकीस आल्याचा उल्लेख केला आहे. तसेच २०२४ मधील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही संदर्भ देण्यात आला असून, हिजाब किंवा नकाब परिधान करणे अत्यावश्यक धार्मिक प्रथा असल्याचा दावा सिद्ध करण्यासाठी पुरेसा आधार सादर करण्यात आलेला नसल्याचे न्यायालयाने नमूद केल्याची आठवण करून देण्यात आली आहे.