Maharashtra-Telangana Border dispute updates:
मुंबई : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या १४ गावांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावांना महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले असून, या निर्णयामुळे सीमाभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या गावांना चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
हा महत्त्वाचा निर्णय विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आमदार देवराज भोंगळे यांच्यासह जिवती तालुक्यातील वादग्रस्त १४ गावांमधील ग्रामस्थ आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा हेदेखील उपस्थित होते. ग्रामस्थांनी यावेळी आपल्या समस्या थेट मंत्र्यांसमोर मांडल्या.
बैठकीदरम्यान, केवळ या १४ गावांच्या समावेशावरच नव्हे, तर राजुरा आणि जिवती तालुक्यांतील इतर प्रलंबित समस्यांवरही चर्चा झाली. महसूलमंत्री बावनकुळे यांनी या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश दिले.
या बैठकीतील निर्णयामुळे, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा सीमाप्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासकीय पातळीवर पुढील कार्यवाही लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सीमाभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.