

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आज 8 फेब्रुवारीला महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक व माजी आमदार वामनराव चटप यानी केले.
गुरुवारी दुपारी गोंडपीपरी तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पोळसा पुलावर माजी आमदार वामनराव चटप व कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करुन विविध मागन्या लावुन धरल्या. यामध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, विजेची दरवाढ तात्काळ राज्यशासनाने मागे घ्यावी, शेती पंपाला दिवसा लोडशेडिंग बंद करावी, विदर्भात येणारे 2 औष्णिक वीज प्रकल्प विदर्भाच्या बाहेर न्यावे, वैधानिक विकास महामंडळ नको विदर्भ राज्य हवे, अन्न धान्यावरील GST रद्द करावी, बल्लारपूर-सुरजागड रेल्वे मार्गाला मंजुरी देत निधी उपलब्ध करावा, बडनेरा – कारंजा – मंगरुळपीर – वाशिम रेल्वेमार्गास केंद्र सरकारने तात्काळ मंजूरी प्रदान करुन निधी उपलब्ध करून द्यावा, आर्वी – पुलगांव (शकुंतला) रेल्वेचे ब्रॉडगेज मध्ये तात्काळ रुपांतर करण्यात यावे, इतर वन्य प्राण्यांप्रमाणे सर्पदंशाने मृत्यु धारकांचे वारसदारांना आर्थिक मदत देण्यात यावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड मध्ये धानाला हमीभावा पेक्षा ४०% जास्त भाव देवून तर मध्यप्रदेशात गव्हाला हमी भावापेक्षा ३०% जास्त भाव देवून खरेदी करण्याची " मोदी गॅरंटी " ची घोषणा केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कापूस व सोयाबीन ला हमीभावापेक्षा ३०% जास्त दर देवून खरेदी करावी, ज्यांनी विक्री केली आहे. त्यांना वाढीव रक्कम त्यांचे बैंक खात्यात जमा करावी आदी विविध मागण्याकरीता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.