मुंबई: निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विशेष मतदार पुनरावलोकन (एसआयआर) मोहीम राबविली जाणार आहे. ‘एसआयआर’मुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा मिळाल्याचा दावा केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेतही भाजपकडून सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. यासाठी, मुंबई भाजपकडून या मोहिमेच्या तयारीसाठी बुधवारी दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सुरुवातीला स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना विभागीय पातळीवर प्रशिक्षित केले जाईल. त्यानंतर आमदार, खासदार आणि मंत्र्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून, अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.
भाजपसाठी एसआयआर मोहीम महत्त्वाची
भाजपच्या या विशेष मोहिमेमुळे आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना, ‘भाजपला आता कुबड्यांची गरज नाही. आपण स्वबळावर चालणारा पक्ष आहोत,’ असे सूचक विधान केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपने एसआयआर साठी आखलेली मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.